आता जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल, चंद्रकांत पाटील यांचा नितीन राऊत यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 05:36 PM2020-08-12T17:36:54+5:302020-08-12T17:37:18+5:30
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे.
मुंबई - राज्यातील वाढलेल्या वीजबिलांच्या मुद्द्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना जनतेला शॉक द्यायची सवय आहे. मात्र जनता लवकरच तुम्हाला शॉक देईल. जनता सर्व काही बघत आहे, लक्षात ठेवा. असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी नितीन राऊत यांना दिला आहे.
राज्यातील वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, " वीजबिलं वाढलेली नाहीत, तर लोकांचा तसा समज झालाय." असे राज्याचे ऊर्जामंत्री सांगत असल्याची बातमी वाचनात आली. हे वाचून महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अत्यंत वाईट वाटले. हे जोडून तोडून तयार झालेले तिघाडी सरकार संपूर्णपणे नागरिकांप्रती असलेली आपली जबाबदारी विसरले आहे.
महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणारे वसई विरार क्षेत्राचे आमदार आणि बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना जे 5.5 लाख रुपये विजेचे बिल आले आहे ते भरण्यास त्यांनी नकार दिला. आश्चर्याची बाब म्हणजे हे बिल त्यांना बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयाचे आले आहे. तसेच वसई विरार मधील नागरिकांना हितेंद्र ठाकूर यांनी आवाहन केले आहे की कोणीही असे चुकीचे वीज बिल भरू नका, ऊर्जामंत्र्यानी हे वाचले नाही का असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी विचारला.
नागपूरमध्ये एका व्यक्तीने 40 हजार रुपये विजेचे बिल भरण्यास असमर्थ असल्याने आत्महत्या केली. ही संपूर्ण शासन आणि प्रशासनासाठी लज्जास्पद आणि खेदजनक घटना होती . त्यांच्या कुटुंबाने विजेचे बिल कमी करण्याची विनंती देखील केली होती परंतु काहीच उपयोग झाला नाही त्यामुळे त्यांना हे पाऊल उचलावे लागले. त्यामुळे मंत्री महोदय, मी आपल्याला परत सांगू इच्छितो की ग्राहकांना 'शॉक' देणं बंद करा. जनतेने मोदींवर विश्वास ठेऊन काँग्रेस आणि राहुल गांधींना जो शॉक दिला आहे तो विसरू नका. येत्या काळात तो तुम्हाला परत महाराष्ट्रात नक्कीच अनुभवायला मिळेल. जनता सर्व काही बघतेय हे लक्षात ठेवा.