"शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासून जोमाने कामाला लागा"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 03:25 PM2020-11-09T15:25:58+5:302020-11-09T15:41:02+5:30
Mumbai : शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी मार्गदर्शन करताना मुंबई महापालिका निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक प्रभागात वॉररुम तयार करावी तसेच इमारत प्रमुख नेमावेत असे आवाहन केले.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोरोना या वैश्विक महामारीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कसलेल्या सेनापतीप्रमाणे राज्याला मार्गदर्शन केले आहे. 'सार्वजनिक आरोग्य' या विषयावर मुख्यमंत्र्यांचा असलेला अभ्यास व त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी राबवलेली 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' ही मोहिम, यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रभाव हळूहळू नियंत्रणात येत आहे. ज्याप्रमाणे टाळेबंदीतून बाहेर पडण्यासाठी आपण 'पुनश्च हरिओम' केले. त्याचप्रमाणे संघटनात्मक पातळीवरही आता पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागण्याची गरज आहे, असे शिवसेना नेते व राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी विभागातील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आतापासूनच जोमाने कामाला लागा, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले आहे. बोरिवली पश्चिम, म्हात्रे वाडी, कोरो केंद्रा जवळील साई कृपा हॉल मध्ये काल रात्री झालेल्या विभाग क्रमांक 1 मधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी येथील सुमारे 100 शिवसेनेचे पुरुष व महिला पदाधिकारी उपस्थित होते.
कोविडच्या काळात विभागातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतुकास्पद काम केले आहे. आता कोरोनाला रोखतानाच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करावे व विभागात शिवसेना सदस्यांची विक्रमी नोंदणी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. तसेच सर्व शाखा शाखांतून मतदार नोंदणी प्रभावीपणे करावी असे मार्गदर्शन प्रास्ताविक भाषणात मेळाव्याचे आयोजक शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस यांनी केले.
शिवसेना विभाग क्र १ मधील सर्वच आजी व माजी पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे कार्यरत राहून संपू्र्ण विभागात भाजपाला रोखावे असे आवाहन शिवसेना उपनेते, मुंबई ईमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांनी केले. याशिवाय, शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर यांनी मार्गदर्शन करताना मुंबई महापालिका निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी प्रत्येक प्रभागात वॉररुम तयार करावी तसेच इमारत प्रमुख नेमावेत असे आवाहन केले.
याप्रसंगी शिवसेना विभाग क्र १ च्या आसीयू व व्हेंटिलेटर युक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेवर आधारीत प्रभाग क्र.७ च्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विभागातील नागरिकांना विनामूल्य वाटप करण्यासाठी तयार केलेल्या फेस मास्कचे यावेळी उद्घाटन करण्यात आले.
सदर मेळाव्यात व्यासपीठावर
मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे, पालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, आर मध्य व आर उत्तर वॉर्डच्या प्रभाग समिती अध्यक्षा सुजाता पाटेकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे व शिवसेनेचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.