Bihar Election: दे धक्का! भाजपाच्या नेत्याचे तिकिट कार्यकर्ता घेऊन पळाला; सारख्या नावाचा घेतला फायदा
By हेमंत बावकर | Published: October 13, 2020 12:38 PM2020-10-13T12:38:38+5:302020-10-13T12:47:16+5:30
Bihar assembly Election 2020: जेव्हा खरा उमेदवार तिकिट घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह भाजपा कार्यालयात गेला तेव्हा त्याला पक्षाचे तिकिट तर विरेंद्र पासवान घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून त्या नेत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. यानंतर शोध सुरु झाला तो डुप्लिकेट विरेंद्र पासवानचा.
राजकारणात कधीकधी मोठमोठ्या नेत्यांना नेहमी सतरंजी उचलणारे कार्यकर्ते धोबीपछाड देतात. असाच एक प्रकार बिहार निवडणुकीत (Bihar assembly Election) घडला आहे. बिहारमध्ये सध्या तिकिट वाटपाचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अशातच उमेदवार नेत्याच्या नामसाधर्म्याचा फायदा त्याच्याच कार्यकर्त्याने उठवत त्याला जोरदार धक्का दिला आहे. या कार्यकर्त्याने भाजपाच्या नेत्याचे तिकिट अक्षरश: ढापले आहे. तसेच अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे देखील गेला होता.
पार्टी विथ डिफरन्सची बिरुदावली मिरविणाऱ्या पक्षात हा प्रकार घडला आहे. पक्षाने बऱ्याचदा नेत्याला डावलून कार्यकर्त्याला नेता केल्याचे प्रकार घडले आहेत. बिहार विधानसभेचा रोसड़ा मतदारसंघ यावेळी भाजपाच्या वाट्याला गेला आहे. येथून विरेंद्र कुमार पासवान यांचे नाव भाजपाने जाहीर केले होते. ही यादी सोशल मीडियावर व्हायरल होताच एक अजब घटना घडली.
भाजपाचा कार्यकर्ता त्याच्याच नेत्याला धक्का देऊन भाजपा कार्लयायात पोहोचला. भाजपाच्या प्रदेश कार्यालयात उमेदवारांची रांग लागली होती. त्यामध्ये हा कार्यकर्ता घुसला. दरभंगाचा राहणाऱ्या या विरेंद्र पासवानने खऱ्या उमेदवाराचे नाव सांगून रोसडा विधानसभेचे तिकिट (एबी फॉर्म) आणि पक्षाचे चिन्ह घेतले. या अर्जावर त्याने त्याचे, वडिलांचे नाव लिहिले आणि समस्तपूर जिल्ह्याच्या रोसडा निवडणूक कार्यालयात पोहोचला.
जेव्हा खरा उमेदवार तिकिट घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह भाजपा कार्यालयात गेला तेव्हा त्याला पक्षाचे तिकिट तर विरेंद्र पासवान घेऊन गेल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून त्या नेत्याच्या पायाखालची वाळूच सरकली. यानंतर शोध सुरु झाला तो डुप्लिकेट विरेंद्र पासवानचा.
यासाठी लगेचच रोसडा निवडणूक कार्यालयात कार्यकर्ते पाठविण्यात आले. तेव्हा खरा प्रकार उघड झाला. कार्यकर्ता तिकिट घेऊन तिथे पोहोचलेला पाहून भाजपा कार्यालयाने त्याला दिलेले तिकिट रद्द केले आणि नवीन पक्षाचा एबी फॉर्म खऱ्या उमेदवाराला दिला. आता समस्तीपूरमध्ये डुप्लीकेट पासवानपासून लांब राहण्यासाठी, सावध राहण्यासाठी लोकांना सूचना करण्याची मोहिम भाजपा कार्यकर्त्यांना उघडावी लागली आहे.