राष्ट्रवादी काँग्रेसचं एक पाऊल पुढे; देशातील पहिल्या 'एलजीबीटी' सेलची स्थापना
By प्रविण मरगळे | Published: October 5, 2020 03:07 PM2020-10-05T15:07:22+5:302020-10-05T15:08:38+5:30
NCP Form LGBT cell in Party, Jayant Patil, Supriya Sule News: देशातील असा पहिला पक्ष आहे. जो भाषणापुरता नाही तर कृती करणारा पक्ष आहे असं मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज देशातील पहिला 'एलजीबीटी सेल' स्थापन केला असून या सेलच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली. राष्ट्रवादीने देशात पहिल्यांदा युवती संघटनेचा प्रयोग केला आणि आता 'एलजीबीटी सेल' स्थापन करुन या वंचित समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
समाजात एलजीबीटी लोक चौकटीत यायला बघत असतात. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे. याचा विचार राष्ट्रवादीने केला आहे शिवाय राष्ट्रवादीने निवडणूक काळात जाहीर केलेल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे पाऊल टाकले आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. एलजीबीटी सेलची आज स्थापना झाली असून प्रिया पाटील आणि त्यांच्यासोबत काम करणारे १४ जण प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यांतर्गत एलजीबीटी वेल्फेअर बोर्डसाठी प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल शिवाय आम्ही निवडणूक काळात जाहीरनाम्यात जे काही जाहीर केले आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे असेही जयंत पाटील म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रिया पाटील यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस असा पक्ष आहे ज्याने युवती संघटना स्थापन केली आणि आता 'एलजीबीटी' सेलची स्थापना करत आहे. देशातील असा पहिला पक्ष आहे. जो भाषणापुरता नाही तर कृती करणारा पक्ष आहे असं मत राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केले. मिशन मोडमध्ये वेल्फेअर बोर्ड सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आला आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. प्रिया पाटील यांनी एलजीबीटी का स्थापन करण्यात येत आहे याची माहिती दिली शिवाय आपण काय करणार आहोत. आपण आजही अधिकारापासून कसे वंचित आहोत हे सांगतानाच राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्याला हा अधिकार मिळवून द्यायचा आहे अशी भूमिका स्पष्ट केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'एलजीबीटी सेल' च्या राज्यप्रमुखपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती जाहीर केली. या सेलची इतर कार्यकारिणी खालीलप्रमाणे उपाध्यक्ष अनिता वाडेकर, जनरल सेक्रेटरी - माधुरी सरोदे - शर्मा, स्नेहल कांबळे, सेक्रेटरी - उर्मी जाधव, सुबोध कासारे, कोषाध्यक्ष - सावियो मास्करीनास, सदस्य - अभिजित ठाकूर, प्रियुष दळवी, श्रेयांक आजमेरा, साहिल शेख, साध्य पवार, रोहन पुजारी, दिव्या लक्ष्मनन आदी. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रिया पाटील उपस्थित होते.