दोस्त दोस्त ना रहा! NDA ची अवस्था; केंद्रीय मंत्रिमंडळात बिगर भाजपाचा एकच मंत्री, तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 01:32 AM2020-10-11T01:32:46+5:302020-10-11T08:29:34+5:30
BJP, Narendra Modi Cabinet, Ramdas Athwale News: मित्रपक्ष झाले कमी । रालोआमध्ये प्रथमच ही स्थिती; भाजपचे जुने सहकारी होऊ लागले दूर
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर व त्याआधी काही मतभेदांमुळे अकाली दल रालोआमधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५१ जणांच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे मंत्री रामदास आठवले वगळता बाकीचे सर्व मंत्री भाजपचेच आहेत.
देशात १९७७ साली पहिले आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. आठवले केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री आहेत. रालोआ २०१९ साली पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपल्या घटक पक्षांना काही मंत्रीपदे देऊ केली होती. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना अवजड उद्योग, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांना अन्नप्रक्रिया खात्याचे व रामविलास पासवान यांना ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री केले होते.
गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीचे सरकार स्थापन केले. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला. कृषी विधेयकांवरून मतभेद झाल्याने हरसिमरत कौर यांनीही मंत्रिपद सोडले. आता प्रदीर्घ आजारामुळे रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.
जनता दल (यु) बाहेरच
2014 साली रालोआतून बाहेर पडलेले व कालांतराने पुन्हा परतलेल्या जनता दल (यु) या पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात सामील न होण्याचा निर्णय घेतला.या पक्षाला दोन मंत्रिपदे हवी होती. ती मिळणार नसल्याने या पक्षाने हा पवित्रा घेतला. नितीशकुमार प्रमुख असलेल्या या पक्षाचे १५ खासदार आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत रालोआने ३४३ लोकसभेच्या जागा लढविल्या होत्या. त्यातील ३०३ जागा भाजप एकटा जिंकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कारकीर्दीत रालोआतील पाच घटक पक्षांच्या खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.