शिवसेनेसोबत युती केली ही एकच गोष्ट चुकली - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 01:00 AM2020-09-19T01:00:33+5:302020-09-19T06:28:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती केली ही एकच गोष्ट चुकली. अन्यथा, भाजपला १५० हून अधिक जागा मिळाल्या असत्या, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई भाजपने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल रॅलीत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भाजपने सेवा सप्ताहाचे आयोजन केले. त्यानिमित्त आयोजित व्हर्चुअल रॅलीत फडणवीस यांच्यासह भाजपचे संघटन मंत्री व्ही. सतिश, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह भाजप आमदार, नेते उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत भ्रष्टाचाराचे अड्डे उदध्वस्त केले. प्रशासकीय यंत्रणेत बाहेरच्या तज्ज्ञांना सामावून घेत प्रशासनाला नवा आयाम दिला. मोदींनी राष्ट्रवादाला कर्तुत्वाची जोड दिली. भारताचे नेतृत्व खंबीर असल्याचे जगाला दाखवून दिले. पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी जागतिक संधी समजून घेत अर्थव्यवस्थेला चालना दिली. त्यांनी गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार केल्याने मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक भारतात आल्याचेही ते म्हणाले.
शेतमालाला चांगला भाव, शेतमालाची मोेठ्या प्रमाणात खरेदी, गरीबांसाठी योजना, लॉकडाउनच्या काळात आत्मनिर्भर अभियानाद्वारे सामान्य जनतेला मदतीचा हात यांसारख्या अनेक गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात राबवण्यात येत आहेत. पंतप्रधानाच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे आणि यापुढेही उभा राहील असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.