ओपनिंग बॅट्समन म्हणून आले, न खेळताच मैदानाबाहेर गेले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:53 AM2019-04-18T06:53:05+5:302019-04-18T06:53:52+5:30
बारावा गडी म्हणून न खेळताच मैदाबाहेर पडले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेतून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खिल्ली उडविली.
अकलूज (सोलापूर) : शरद पवार ओपनिंग बॅट्समन म्हणून मैदानात आले. मात्र, बारावा गडी म्हणून न खेळताच मैदाबाहेर पडले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेतून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची खिल्ली उडविली.
मोदींनी भाषणात पवार यांनाच पुन्हा लक्ष्य बनविले. ते म्हणाले, सभेला उपस्थित असलेल्या गर्दीमुळे शरदरावांनी मैदान का सोडले, याची मला कल्पना आली आहे. आपल्यावर व पवार परिवारावर संकट येऊ नये, म्हणून त्यांनी मैदान सोडण्याची आधीच खबरदारी घेतली.
मोदी पुढे म्हणाले की, भारताला एकविसाव्या शतकात सक्षम करण्यासाठी केंद्रामध्ये मजबूत व सक्षम सरकार हवे. मुलांसाठी जसे उत्तम शिक्षक लागतात, आपल्या रक्षणासाठी सक्षम पोलीस लागतात, तसेच सक्षम देश चालविण्यासाठी सरकार उत्तम सरकार हवे. माढावाल्यांनो, तुम्हाला मजबूत हिंदुस्तान हवा की मजबूर हिंदुस्तान? असा प्रश्न विचारून ते म्हणाले, जवानांनी बालाकोटवर हल्ला केल्याचा तुम्हाला गर्व आहे की नाही ? माझी दिशा योग्य आहे की नाही ? मला हे करायला हवे होते की नाही? आमचे काय चुकले ? आमच्यावर हल्ला झाल्यावर आम्ही शत्रूला घरात घुसून मारत असतो. मात्र काही राजकीय पक्षांना याची अडचण होत आहे. पण आपला हा चौकीदार त्यांना कधीच यशस्वी होऊ देणार नाही. तुमच्या या सेवकाने पाच वर्षे सरकार चालवले आणि भ्रष्टाचाराचा डाग लागू दिला नाही. मात्र त्यांना हे पाहावले जात नाही म्हणून आरोप होत आहेत. तुमच्या समर्थनामुळे साडेतीन लाखांहून अधिक बोगस कंपन्यांना एका क्षणात बंद केल्यात. देशातील दलाली बंद केली आहे.
>मागास असल्याने ‘चोर’ म्हणतात
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता ते म्हणाले, काँग्रेसचे नामदार चौकीदारांना ‘चोर’ म्हणतात. मात्र, देशातील लाखो चौकीदार मैदानात येताच, त्यांच्या तोंडाला कुलूप लागले. सर्व चोरांची नावे ‘मोदी’ का आहेत? असे नामदार विचारतात. आम्ही मागास समाजातून आलो आहोत. या मागास समाजाला ते ‘चोर’ म्हणतात. मागासलेल्या लोकांना ‘चोर’ म्हणण्याची हिंमत तुम्ही करत असाल, तर आम्ही सहन करणार नाही.
>काँग्रेस-राष्ट्रवादी माझ्याविरुद्ध लढत आहेत. देशाला कुठे न्यायचे, याचा अजेंडा त्यांच्याकडे नाही. म्हणूनच ते ‘मोदी हटाव, मोदी हटाव’ म्हणत राहतात. देशाचा जयजयकार कसा होईल, याचा विचार यांच्याकडे नाही.
>शरदराव, तुम्ही तुमचे गुरू यशवंतराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घेतली असती, तर कळले असते. दिल्लीच्या एका खास परिवाराकडून तुम्ही शिकलात, त्यांच्या सेवेत असता. तेच तुमचे मॉडेल आहेत.