भाजपाच्या ‘मिशन रिपीट’ला विरोधकांचा सुरुंग?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 06:18 AM2019-01-21T06:18:54+5:302019-01-21T06:19:12+5:30
अनेक युद्धांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या हरियाणात निवडणुकांच्या रणदुदुंभी वाजू लागल्या आहेत.
- सुहास शेलार
अंबाला : अनेक युद्धांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या हरियाणात निवडणुकांच्या रणदुदुंभी वाजू लागल्या आहेत. २०१४ साली एकहाती सत्ता स्थापन केलेल्या भाजपाचे ‘पानिपत’ करण्यास विरोधक सज्ज झाले आहेत. भाजपाने पुन्हा एकदा हरियाणा जिंकण्यासाठी ‘मिशन रिपीट’चा नारा लगाला आहे. मात्र, आठ दिवसांवर आलेल्या ‘जिंद’ विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी आखलेले डावपेच, कुरघोडीचे राजकारण आणि प्रचार तोफांच्या फैरी पाहता यंदाची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भाजपासाठी अवघड असल्याचेच चित्र सध्या आहे.
भाजपाने स्थानिक पक्ष इंडियन नॅशनल लोक दल, हरियाणा जनहित काँग्रेस, तसेच काँग्रेस आणि बसपाला धूळ चारत लोकसभेच्या दहापैकी सात जागांवर विजय मिळविला. विधानसभा निवडणुकीतही ४७ जागा जिंकत सत्ता स्थापन केली.
मात्र, गेल्या पाच वर्षांत चित्र पालटले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे संप, शेतकºयांचे आंदोलन, सराफ व्यापाºयांची नाराजी, जाट आरक्षणाचा प्रश्न थोपवताना झालेल्या हिंसेमुळे येथील सर्वसामान्य जनतेत भाजपाविषयी प्रचंड रोष आहे.
नुकत्याच झालेल्या पाच महानगरपालिकांच्या निवडणुकांत भाजपाने वर्चस्व राखले आहे. त्यामुळे तीन राज्ये हातची गेल्यानंतर किमान हरियाणात तरी सत्ता राखण्याच्या भाजपाच्या आत्मविश्वासाला उभारी मिळाली आहे. तरी भाजपाला शिकस्त देण्यास विरोधकांनीही कंबर कसली आहे.
हरियाणात यंदा आम आदमी पार्टी, जननायक जनता पार्टी, लोकतंत्र सुरक्षा पार्टी हे पक्षदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे. या मतविभाजनाचा फायदा करून घेण्यासाठी स्थानिक पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
काँग्रेसने रणजीत सिंह सुरजेवाला यांच्याकडे हरियाणाची अप्रत्यक्ष कमान सोपविली आहे. जिंद पोटनिवडणुकीसाठी दिग्गजांची नावे डावलून सुरजेवाला यांना दिलेली उमेदवारीही, याच रणनीतीचा एक भाग आहे. एकंदरीत हरियाणात भाजपाच्या गडाला सुरुंग लावण्यास विरोधकांनी तयारी केल्याचे दिसून
येत आहे. मात्र, विरोधकांचे डाव हाणून पाडण्यासाठी भाजपा कोणते गनिमी कावे वापरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
>खट्टर यांची फौज मैदानात
हरियाणातील पाच महानगरपालिका जिंकून भाजपाने ‘मिशन रिपीट’चा नारा लगावला आहे. विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभा जिंकण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार खट्टर यांनी शहर आणि ग्रामीण अशी विभागवार कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.