आमचा एकतरी आला; विधान परिषद निकालांवरून देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 12:28 PM2020-12-04T12:28:25+5:302020-12-04T12:29:30+5:30
Vidhan Parishad Election Result, Devendra Fadanvis: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरून शिवसेनेला डिवचले आहे. भाजपाला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ गमवावे लागले आहेत.
मुंबई : विधान परिषदेच्या सहा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, भाजपा १ आणि अपक्ष १ असे चित्र आहे. भाजपाला या निवडणुकीत जोरदार फटका बसला असून नागपूर आणि पुणे हे पारंपरिक मतदारसंघ गमवावे लागले आहेत. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया आली आहे.
राज्यात एकच जागा जिंकता आल्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी आम्ही बेसावध राहिल्याची कबुली दिली आहे. यामुळेच निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करु, पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही, असे ते म्हणाले.
तर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरून शिवसेनेला डिवचले आहे. ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसं ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही त्यांनीही आत्मचिंतन करावं, असा सल्ला फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता दिला आहे.
तर महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील ट्विट करत भाजपावर निशाना साधला आहे. थेट जनतेतून मतदान झालेल्या पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये भाजपची धुळधाण झाली आहे. ही महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' आहे, अशी टीका केली आहे.
थेट जनतेतून मतदान झालेल्या पाच विधान परिषद मतदारसंघांच्या निवडणुकीत कोल्हापूरपासून गोंदियापर्यंत तब्बल २४ जिल्ह्यांमध्ये भाजपची धुळधाण झाली आहे.
— Ashok Chavan (@AshokChavanINC) December 4, 2020
ही महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र एक्सप्रेस' आहे. pic.twitter.com/0q5rysycU1