"तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपये देणारे आहोत"
By मोरेश्वर येरम | Published: November 25, 2020 11:49 AM2020-11-25T11:49:19+5:302020-11-25T11:56:30+5:30
एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप सारंकाही तोडण्याची तर आम्ही सारं जोडण्याची भाषा करतो, अशी टीका ओवेसी यांनी केलीय.
हैदराबाद
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये पालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. एआयएमआयएम, भाजप आणि टीआरएस या तिन्ही पक्षांकडून येथे जोरदार प्रचार सुरू आहे. एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजप विरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. भाजप सारंकाही तोडण्याची तर आम्ही सारं जोडण्याची भाषा करतो, अशी टीका ओवेसी यांनी केलीय.
हैदराबाद पालिका निवडणुकीच्या प्रचारात आजमपुरा येथे ओवेसी बोलत होते. ''तुम्ही मस्जिद पाडणारे आहात, तर आम्ही मंदिरासाठी १० कोटी रुपयांची मदत करणारे लोक आहोत. आम्ही नेहमी जोडण्याची भाषा करतो तर तुम्ही नेहमी तोडण्याच्या भूमिकेत असता हाच तुमच्यात आणि आमच्यातला फरक आहे", असं ओवेसी यावेळी म्हणाले.
''तेलंगणा विधानसभेत अकबरुद्दीन ओवेसी यांनी एका मंदिरासाठी १० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री आश्चर्यचकीत झाले होते. तर भाजपला फार त्रास झाला होता. सर्व धर्माचे लोक इथं राहतात आणि प्रत्येकाला त्याच्या धर्माचं पालन करता यावं असं आम्हाला वाटतं. हाच आमच्या पक्षाचाही विचार आहे'', असंही ओवेसी म्हणाले.