'हे बाबरचं सैन्य', कंगनाचा शिवसेनेवर बाण; ऑफिसचं तोडकाम पाहून म्हणाली 'पाकिस्तान'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 11:48 AM2020-09-09T11:48:27+5:302020-09-09T12:12:27+5:30

कंगना राणौतनं ट्विट करुन बीएमसीच्या तोडक कारवाईला पाकिस्तान असं कॅप्शन दिले आहे तसेच लोकशाहीचा मृत्यू आहे असं म्हटलं आहे.

Pakistan caption to BMC Action; Kangana Ranaut likened Babar to Shiv Sena | 'हे बाबरचं सैन्य', कंगनाचा शिवसेनेवर बाण; ऑफिसचं तोडकाम पाहून म्हणाली 'पाकिस्तान'

'हे बाबरचं सैन्य', कंगनाचा शिवसेनेवर बाण; ऑफिसचं तोडकाम पाहून म्हणाली 'पाकिस्तान'

Next

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहे. मात्र तत्पूर्वी मुंबई महापालिकेने कंगनाच्या अनाधिकृत बांधकामावर तोडक कारवाईला सुरुवात केली आहे. कंगनाच्या घराबाहेर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा आणि महापालिकेचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत. याठिकाणी पालिकेकडून कंगनाच्या घरामधील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करत आहेत.

याबाबत कंगना राणौतनं ट्विट करुन बीएमसीच्या तोडक कारवाईला पाकिस्तान असं कॅप्शन दिले आहे तसेच लोकशाहीचा मृत्यू आहे असं म्हटलं आहे. बीएमसीचे अधिकारी आणि कर्मचारी कंगनाच्या घराबाहेर तैनात असलेला फोटो ट्विट करत बाबर आणि त्याची फॅमिली असं सांगत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

याआधी कंगनानं मणिकर्णिका फिल्मचा पहिला सिनेमा अयोध्येची घोषणा झाली. ही माझ्यासाठी फक्त एक इमारत नसून राम मंदिर आहे. आज त्याठिकाणी बाबर आलेत. आज इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. राम मंदिर तुटणार पण बाबरने लक्षात ठेवावं हे मंदिर पुन्हा बनणार, जय श्री राम असंही कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मी चुकीची नव्हते, माझ्या शत्रूंनी वारंवार ते सिद्ध केलं, मी मुंबईला का पीओके म्हटलं होतं असंही कंगनानं म्हटलं आहे.

कंगनाच्या घरात असे केलेत अनधिकृत बदल

तळमजल्याजवळील शौचालयाच्या जागेत ऑफिससाठी केबिन,  स्टोअर रूममध्ये अनधिकृतपणे स्वयंपाकघर, जेवणासाठी अनधिकृतपणे जागा तयार, जिन्याजवळ आणि तळमजल्याजवळच्या पार्किंग लॉटमध्ये दोन अनधिकृत शौचालये बांधली, पहिल्या मजल्यावर अनधिकृतपणे केबिन, देवघरातच बैठकीसाठी रूम, स्लॅब टाकून अनधिकृत शौचालय, पहिला मजला अनधिकृतपणे वाढवला, दुसर्‍या मजल्यावरील जिन्याच्या रचनेत बदल, बाल्कनीत फेरफार, स्लॅब टाकून मजल्याचा उभा विस्तार, शौचालय तोडून त्या जागेचा इतर गोष्टींसाठी  वापर, बाजूच्या बंगल्यातील एक बेडरूम पार्टिशन तोडून स्वत:च्या बंगल्यात सामावून घेतला, बंगल्याच्या मुख्य गेटची दिशा बदलली.

महापालिकेने बजावली होती नोटीस

कंगनाच्या कार्यालयाबाहेर मंगळवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोटीस लावली. कार्यालयात अवैध बांधकाम करण्यात आलं असून रहिवासी भागाचा कार्यालयीन वापर करण्यात आल्याचं नोटिशीत नमूद करण्यात आलं होतं. अधिनियम ३५४ अ अंतर्गत नोटीस लावण्यात आली होती. या नोटिशीची मुदत २४ तास होती.  कंगनानं कार्यालयात बांधकाम करताना मुंबई महापालिकेच्या अधिनियम ३५४ अ चं उल्लंघन केल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पालिकेच्या नोटिशीत सात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. इमारतीचं बांधकाम पालिकेच्या नियमानुसार झालेलं नाही. दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचं बांधकाम अनधिकृतपणे करण्यात आलं आहे. नकाशात बेडरुमसोबत शौचालयं दाखवण्यात आलं होतं. कागदपत्रांत शौचालयं दाखवण्यात आलेली जागा प्रत्यक्षात मात्र ये-जा करण्यासाठी वापरण्यात आली आहे, असं पालिकेनं नोटिशीत म्हटलं आहे.

ना डरुंगी...ना झुकूंगी

राणी लक्ष्मीबाईचं धाडस, शौर्य आणि बलिदान मी सिनेमाच्या माध्यमातून जगले आहे. हे लोक मला माझ्या महाराष्ट्रात येण्यापासून रोखत आहेत याचं दु:ख आहे. मी राणी लक्ष्मीबाईच्या मार्गावर चालत आहे. मी कोणालाही घाबरणार नाही आणि झुकणारही नाही. चुकीच्या गोष्टींविरोधात सतत आवाज उचलत राहणार आहे, जय महाराष्ट्र, जय शिवाजी असंही कंगनानं ट्विटमधून शिवसेनेचं नाव न घेता बजावलं आहे.

कंगना-शिवसेना वादाची सुरुवात कशी झाली?

कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं.

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने अनेक कलाकारांपासून नेटिझन्सने कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. यादरम्यान कंगनानं शुक्रवारी ट्विट केले, त्यात लिहिलं की, मी बघत आहे, अनेक लोक मला मुंबईत येण्यापासून धमकी देत आहेत. त्यामुळे मी ९ सप्टेंबरला मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मी कोणत्या वेळी येणार हे मी पोस्ट करेन, कोणाच्या बापात हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असं तिने थेट आव्हान दिले होते. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी कंगना राणौतच्या पोस्टर्सला जोडेमारो आंदोलन केले होते

Read in English

Web Title: Pakistan caption to BMC Action; Kangana Ranaut likened Babar to Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.