पलानीस्वामी भ्रष्टाचारामुळे अडकले आहेत सापळ्यात - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 05:22 AM2021-03-29T05:22:54+5:302021-03-29T05:23:33+5:30
अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत
चेन्नई : अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी हे भ्रष्टाचारामुळे सापळ्यात अडकले असल्यामुळे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर गुडघे टेकून आहेत, अशा शब्दांत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ला केला.येथे रविवारी प्रचारसभेत बोलताना गांधी म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांवर नियंत्रण ठेवून शांतपणे त्यांंना आपल्या पाया पडायला लावतात हे मी पाहिले. मी हे अजिबात स्वीकारू शकत नाही.” उत्तर प्रदेशमध्ये नेत्याला अमित शहा यांच्यासमोर वाकायला लावले कारण तो नेता भ्रष्ट होता आणि भ्रष्टाचारामुळे त्याने स्वातंत्र्य गमावले होते. अशाच परिस्थितीला पलानीस्वामी यांनी तोंड दिले, असा दावा गांधी यांनी केला. उत्तर प्रदेशमधील नेत्याचे नाव गांधी यांनी घेतले नाही.
गांधी म्हणाले, “शोकांतिका ही आहे की, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना अमित शहा यांच्यासमोर वाकावे, असे वाटत नाही आणि तामिळनाडूच्या कोणत्याही व्यक्तिला असेच वाटते. तथापि, पलानीस्वामी यांनी जो भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यांना शहा यांच्यापुढे वाकणे भाग पडले.” तामिळनाडूच्या जनतेचा जो पैसा पलानीस्वामी यांनी चोरला त्यामुळे ते आता सापळ्यात अडकले आहेत, असे गांधी म्हणाले. महान तमिळ संस्कृतीशी नाळ जोडलेले पलानीस्वामी जेव्हा मोदी आणि शहा यांच्यासमोर वाकताना पाहिले तेव्हा मला संताप आला, असेही गांधी म्हणाले. मोदी आणि शहा यांच्या पाया पडा आणि त्यांच्यासमोर नतमस्तक व्हा मग ती व्यक्ती भाजपची असो किंवा आघाडीतील इतर पक्षांची भाजपला या नात्याशिवाय दुसरे नातेच समजले नाही, असा दावा गांधी यांनी केला. ते म्हणाले, आमच्या कल्पना वेगळ्या आहेत. आमच्यासाठी जे नाते समान नाही ते निरूपयोगी आहे. भारताच्या पायाचा भाग तामिळनाडू असल्याचे सांगून गांधी यांनी तमिळ भाषा शिकण्याची माझी इच्छा आहे, असे म्हटले.