विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 10:03 PM2024-10-27T22:03:09+5:302024-10-27T22:06:10+5:30

Palghar Assembly election Rajendra Gavit: माजी खासदार राजेंद्र गावित यांना अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. 

Palghar Assembly election 2024: BJP rejects Lok Sabha nomination, now former MP Rajendra Gavit has been nominated by Shinde for Legislative Assembly | विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी

विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी

Rajendra Gavit News: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीत एकूण २० उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली असून, यात एक नाव माजी खासदार राजेंद्र गावित यांचं आहे. २०१९ मध्ये पालघर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या राजेंद्र गावितांना यावेळी उमेदवारीच मिळाली नाही. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी गावित निवडणूक लढवणार आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये गेलेल्या राजेंद्र गावितांनी सहा महिन्यातच परत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. पालघर लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटल्याने राजेंद्र गावितांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण, भाजपने त्यांना उमेदवारीच दिली नाही. 

आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र गावितांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली. एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र गावित यांना पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. 

विद्यमान आमदाराचा पत्ता कट

एकनाथ शिंदेंनी पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचा पत्ता कट करत राजेंद्र गावित यांना संधी दिली आहे. वनगा यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याचा विश्वास होता, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर गावितांची उमेदवारी घोषित केली. 

श्रीनिवास वनगा यांना राजकीय पुनर्वसन करण्याचा मुख्यमंत्री शिंदे शब्द दिला असल्याची चर्चा स्थानिक राजकारणात सुरू आहे. असं असलं तरी ऐनवेळी भाजपतून शिवसेनेत आलेल्या गावितांना विजयी करण्यासाठी वनगा किती प्रयत्न करतात, या चर्चेलाही राजकीय वर्तुळात तोंड फुटलं आहे.  

२०१९ मध्ये श्रीनिवास वनगा यांना ६८,०४० मते मिळाली होती. तर त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या योगेश नाम यांना २७,७३५ मते मिळाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेश गोवारी यांना १२,८१९ मते मिळाली होती, तर वंचित बहुजन आघाडीचे विराज गडग यांना ११,४६९ मते मिळाली होती. महत्त्वाचं म्हणजे नोटा लाही ७,१३५ मते पडली होती. वनगा यांनी ४०,३०५ मतांचे मताधिक्य घेत विजय मिळवला होता. त्यामुळे यावेळीही या मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. 

Web Title: Palghar Assembly election 2024: BJP rejects Lok Sabha nomination, now former MP Rajendra Gavit has been nominated by Shinde for Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.