Pandharpur Byelection: अभिजित बिचुकलेंनी शड्डू ठोकला; आता पंढपुरातून पोटनिवडणूक लढविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:12 PM2021-03-30T13:12:22+5:302021-03-30T13:18:46+5:30
Pandharpur Byelection news: राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोणतीही निवडणूक लागली की भर अर्ज आणि हो उभा, अशा काहीशा पवित्र्यात असलेले व नेहमी चर्चेत राहणारे मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (abhijeet bichukale) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Abhijit bichukale will contest pandharpur byelection. )
राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना, तर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. थोड्याच वेळात ते अर्जदेखील दाखल करणार आहेत. एकीकडे भावनिक राजकारण विरोधात भाजपा असा सामना असताना ही पोटनिवडणूक आणखी एका व्यक्तीमुळे चर्चेत येणार आहे. मराठी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली आहे.
विठुरायाच्या नगरीची नेत्यांनी केलेली दुरवस्था बघवत नाही आणि राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी पंढरपूर पोट निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करणार असल्याचे अभिजीत बिचुकले यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.
मंगळवेढा येथील पाणीप्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही असा सवाल करत आपण या निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही बिचुकले यांनी व्यक्त केला.
बिचुकले हे विविध कारणांनी चर्चेत असतात. राज्यसभा खासदार उदयन राजेना देखील लोकसभा निवडणुकीत आव्हान दिले होते. विधानसभेला त्यांनी युवा सेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात देखील निवडणूक लढविली होती. यानंतर त्यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. मात्र तेव्हा पत्नीचे नाव मतदार यादीत होते, परंतु त्यांचे नाव नसल्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. अनेकदा त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे, तरीदेखील बिचुकले यांची निवडणूक लढविण्याची हौस कायम आहे.