Pandharpur Election Results Live: पंढरपूरात भाजपाला विठ्ठल पावला, समाधान आवताडे विजयी; राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 17:42 IST2021-05-02T17:38:33+5:302021-05-02T17:42:05+5:30
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल २०२१: आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगिरथ यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. परंतु या निवडणुकीत त्यांना पराभव सहन करावा लागला आहे.

Pandharpur Election Results Live: पंढरपूरात भाजपाला विठ्ठल पावला, समाधान आवताडे विजयी; राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंचा पराभव
पंढरपूर – राज्यात महाविकास आघाडीला पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालाने मोठा धक्का बसला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे यांनी बाजी मारली आहे. विजयी उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला आहे. पंढरपूरातील पोटनिवडणुकीच्या विजयामुळे भाजपा नेत्यांचे चेहरे आनंदाने फुलले आहेत. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या निकालावर भाष्य करणं टाळलं आहे.
पंढरपूर पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून भाजपाचे समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती. सुरूवातीच्या काही कलानंतर आवताडे पिछाडीवर जातील असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांना होता. परंतु शेवटपर्यंत आवताडे यांनी आघाडी वाढतच गेली. अखेर ३८ व्या फेरीनंतर समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला गेला. या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार समाधान आवताडे यांना १ लाख ७ हजार ७७४ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या भगिरथ भालकेंना १ लाख ४ हजार २७१ मते मिळाली. याठिकाणी अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांना २ हजार ९३० मते मिळाली. त्याचसोबत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला १ हजार १८७ मतांवर समाधान मानावं लागलं. समाधान आवताडे हे सोलापूर जिल्ह्यातील भाजपाचे ५ वे आमदार म्हणून निवडून आले आहेत.
आवताडे आणि परिचारक यांच्या एकीचा विजय
मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला. दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्ते आणि परिचारक आवताडे यांच्या एकीला दिलं.