"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 03:22 PM2024-10-12T15:22:54+5:302024-10-12T15:26:56+5:30

Pankaja Munde Dasara Melava Speech in Marathi: सावरगावातील भगवान गडावर विजयादशमीनिमित्त पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना त्यांनी तीव्र झालेल्या जातीय संघर्षावर भाष्य केले. 

Pankaja Munde comments on Maratha vs OBC Reservation conflict at Dussehra gathering, indirectly targets Manoj Jarange | "...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत

"...यासाठी आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही"; पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात व्यक्त केली खंत

Pankaja Munde Dasara Melava Speech 2024: लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघात जातीय संघर्षाचा फटका बसला. त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. बीड जिल्ह्यासह टोकदार होत चाललेल्या जातीय संघर्षावर पंकजा मुंडेंनी सावरगावातील भगवान गडावर झालेल्या दसरा मेळाव्यात भाष्य केले. 'हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही', असे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. 

पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात काय बोलल्या?

"पंकजा मुंडे खोटं बोलते का? पंकजा मुंडे थापा मारते का? पंकजा मुंडे अंधारात एक, उजेडात एक वागते का? कुणाला घाबरते का? अंधारात कुणाला जाऊन भेटते का? मी कुणाला घाबरत नाही. घाबरते ते या समोरच्या मैदानात माझं भाषण ऐकायला लोक नसतील, त्या दिवसाला घाबरते. मी भगवान बाबांना प्रार्थना करेन की, असा दिवस सुद्धा उजाडू देऊ नका", असे म्हणत पंकजा मुंडेंनी मनातील भीती बोलून दाखवली. 

कधीच भेदभाव केला नाही, पण गडबड झाली -पंकजा मुंडे

बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल पंकजा मुंडे म्हणाल्या, "या बीड जिल्ह्यातील गरीब माणसाचं भलं करण्यासाठी मी काम केलं. एकही गाव सोडलं नाही. गावात मायनस बूथ (कमी मतदान झालेलं) तरी तेवढाच निधी दिला, जितका ९० टक्के मतदान झालेल्या गावाला दिला. कधीच भेदभाव केला नाही. यावेळी गडबड झाली. ते जाऊद्या. आपल्याला ही गडबड पुसून काढायची आहे." 

जातीवर स्वार होणाऱ्यांच्या पाठीमागे उभं राहायचं नाही -पंकजा मुंडे

"या राज्यातील प्रत्येक जातीच्या माणसाला विश्वास वाटावा, असं नेतृत्व गोपीनाथ मुंडे होते. छत्रपतींच्या घराण्यांनीही मुंडे साहेबांवर प्रेम केलंय. आज समाजाला काय झालंय? एखाद्या गाडीने एखाद्या लेकराला उडवलं, तर लोक विचारतात की गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवलेल्याची जात काय? एखाद्या नराधमाने एखाद्या लहान चिमुकलीचा जीव घेतला, तिच्यावर अत्याचार केला. तर लोक विचारतात त्या मुलीची जात काय आणि त्या अत्याचार करणाऱ्याची जात काय? हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील २२ वर्षे खपवली नाही. आम्हाला असा समाज घडवायचा नाही. आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर बघून काम द्यायचं आहे. जात बघून काम देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठिमागे उभं राहायचं आहे. उगीच जातीवर स्वार होणाऱ्या कुणाच्याही पाठीमागे उभं राहायचं नाही", असं म्हणत पंकजा मुंडेंनी विरोधकांवर नामोल्लेख न करता निशाणा साधला. 

भगवान बाबा माफ करतील का?

"मला या देशामध्ये, या राज्यामध्ये कोणीही एखादी फाईल समोर आणली आणि एखाद्या अधिकाऱ्याचं काम असलं की हळूच ते म्हणत की ताई आपला जवळचा आहे. आपला पाहुणा आहे. अरे त्याच्यावर विनयभंगाची केस आहे ना, कसला पाहुणा? असल्या गोष्टी करायला भगवान बाबा माफ करतील का?", असा उलट सवाल त्यांनी समर्थकांना केला.

Web Title: Pankaja Munde comments on Maratha vs OBC Reservation conflict at Dussehra gathering, indirectly targets Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.