Pankaja Munde: गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं पंकजा भावूक; भाजपासाठी केलेल्या संघर्षासाठी आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 01:36 PM2021-07-09T13:36:55+5:302021-07-09T13:38:20+5:30
त्याचसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कपिल पाटील, भारती पवार यांचा फोन आला, त्यांना मी शुभेच्छा दिल्या. दिल्लीला बोलावणं आलं तेव्हा भागवत कराड यांनीही मला फोन केला त्यांच्यांशीही माझं बोलणं झालं आहे.
मुंबई – केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश न झाल्यानं मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या चर्चेवर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. मी कुठेही नाराज नाही, जे कोणी मंत्री झालेत त्यांचे मनापासून अभिनंदन आहे. पक्षाच्या नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाही. पक्षाचा निर्णय मला पटला आहे असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.
याबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या की, केंद्रातल्या सर्व नव्या मंत्र्यांचे अभिनंदन केले. मला अनेकांचे फोन आले, मेसेज आले. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. हिना गावितांच्याही नावाची चर्चा होती. परंतु मुंडे साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत. आम्ही कुठेही नाराज नाही. एखाद्याला संधी मिळाली तर त्यांना शुभेच्छा देणं आमचं काम आहे. प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा होती. बातम्या येत होत्या की प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्या. ती चुकीची बातमी होती म्हणून ट्विट केले असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कपिल पाटील, भारती पवार यांचा फोन आला, त्यांना मी शुभेच्छा दिल्या. दिल्लीला बोलावणं आलं तेव्हा भागवत कराड यांनीही मला फोन केला त्यांच्यांशीही माझं बोलणं झालं आहे. माझं लोकांची नाते आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज वैगेरे काही नाही. माझ्या नाराजीची काही कारण नाही. मला कुठलाही आक्षेप नाही. पक्षाचा निर्णय सर्वमान्य आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितले.
भाजपा मला संपवत आहे असं वाटत नाही
तसेच भारतीय जनता पार्टीत निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे. प्रीतम मुंडे, हिना गावित यांची नावं चर्चेत होती. ती नावं न येता दुसऱ्यांना संधी मिळाली. पक्ष संघटनेच्या दृष्टीकोनातून नेतृत्व निर्णय घेत असतं. प्रत्येक राज्याच्या बाबतीत असं होत असतं. प्रीतम मुंडे खूप कष्टाळू आहेत, केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या इतकची मर्यादित नाही तर त्यांचे कामही चांगले आहे. सर्वाधिक मतांच्या फरकाने त्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत आले. पक्षाने घेतलेला निर्णय पटलेला आहे. भाजपा मला संपवत आहे असं मला वाटत नाही. मी छोटीशी कार्यकर्ता आहे त्यासाठी पंतप्रधानापर्यंत मला संपवण्याचा प्रयत्न कसा होईल? असा प्रश्न पंकजा मुंडेंनी केला.
मी फक्त वंजारी समाजाची नाही, तर...
गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाला एकत्र करण्याचं काम केले आहे. मी फक्त वंजारी समाजाची आहे हे मान्य नाही. मी राज्याची महिला नेता, चांगली वक्ता आहे. वंजारी समाजातील व्यक्ती मोठा होत असेल तर मी त्याच्या पाठिशी आहे आणि राहणार आहे. पक्षाने भागवत कराड यांना संधी दिली आहे. त्यांचा पक्ष संघटनेसाठी फायदा होईल. भविष्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी त्यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात हे दिसून येईल. पक्ष वाढवण्यासाठी नेते चांगले निर्णय घेत असतात. पक्ष मजबूत व्हावा यासाठी निर्णय घेतले जातात. पक्षाच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. नव्या लोकांना संधी दिली जात आहे असं पंकजा म्हणाल्या.
टीम देवेंद्र, टीम नरेंद्र भाजपाला मान्य नाही
टीम देवेंद्र, टीम नरेंद्र असं भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष असं धोरण आहे. मी पणा भाजपात नाही. आपण, आपण ही संस्कृती भाजपात आहे. भाजपाच्या संस्कृतीला मानणारी मी पक्षाची सामान्य कार्यकर्ता आहे. वेळोवेळी मी हे सांगितले आहे. पक्षनिष्ठा माझ्या बापाने मला दिली आहे. राज्यात मुंडे-महाजन नेतृत्व करत होते तेव्हा तळागळातील लोकांना एकत्र आणून मुंडे साहेबांनी लोकांना संधी दिली आहे असं पंकजा मुंडेंनी सांगितले.
...अन् पंकजा मुंडे गहिवरल्या
प्रीतम मुंडे वडिलांच्या मृत्यूनंतर निवडणूक उभ्या राहिल्या तेव्हा त्या रेकॉर्डब्रेक निवडून येणारच होत्या. यंदाच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे यांनी स्वत:च्या मेरिटवर जिंकल्या माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षाकडे येणारी आहे. मी म्हणजे पक्ष नाही. ज्यांना मंत्रिपद मिळालं त्यांच्यामुळे भाजपाला ताकद मिळणार असेल तर चांगली गोष्ट आहे. माझ्या आईला जी पेन्शन मिळते ती दुसऱ्या टर्मसाठी मिळत नाही. गोपीनाथ मुंडेसाहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. फार मोठी पुण्याई आहे. त्यांच्यामुळे आज मी इथं बसली आहे. यामागे २५-३० वर्षाचा संघर्ष आहे. मी आताही काम केले तरी २५-३० वर्ष संघर्ष करावा लागेल. नेता हा नेता असतो. जो वंचित आहे त्यांना न्याय देण्याचं काम गोपीनाथ मुंडे साहेबांनी शिकवलं आहे. अनेकदाच वंचितांना न्याय देण्यासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन त्यांनी भूमिका घेतली. त्यामुळे पक्षाची ताकदच वाढली कमी झाली नाही अशा शब्दात पंकजा मुंडेंनी वडिलांच्या आठवणीने गहिवरल्या.