'पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं, त्यांचा सन्मानच होईल'; शिवसेना नेत्याचं पंकजांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 05:37 PM2021-07-30T17:37:51+5:302021-07-30T17:38:19+5:30
Gulabrao Patil on Pankaja Munde: प्रवेश केल्यानंतर त्यांना पद काय द्यायचे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील.
जळगाव: राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराचे काम मोठे आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच मुंडे साहेबांच्या वारसदाराला कुठेतरी न्याय, सन्मान मिळायला हवा, अशी समाजाची रास्त अपेक्षा आहे. पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागतच आहे. त्यांना आमच्याकडे स्थान व सन्मान मिळेल, असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडे यांना थेट शिवसेनेत येण्याचे आवाहनच केले आहे.
जळगाव तालुक्यातील किनोद येथे शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमाला उपस्थित दिली. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सध्या भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. यासंदर्भात पत्रकारांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी आपले मत मांडले. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून हवे तसे प्रतिनिधीत्व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी पडतीच्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना प्रतिनिधित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे व पंकजा मुंडे यांना भाजपने तिकीट दिले नव्हते. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे भाजपकडून कुठेतरी खच्चीकरण केले जात असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला.
त्यांच्या पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेणार
पंकजा मुंडे यांना योग्य स्थान व प्रतिनिधित्व शिवसेनेत मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे. यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्यांचे स्वागतच राहील. प्रवेश केल्यानंतर त्यांना पद काय द्यायचे, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील. ते सांगण्यासाठी मी एवढा मोठा नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.