'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहेत का?'; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 12:59 PM2021-08-16T12:59:13+5:302021-08-17T10:49:22+5:30
Bhagwat Karad Janashirwad Yatra: केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज परळीतून जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात केली.
परळी: केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुरु केली आहे. या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवात परळीमधून होत आहे. दरम्यान, ही यात्रा सुरु होण्यापूर्वीच परळीत गोंधळ झालेला पाहायला मिळाला. प्रितम मुंडे यांना डावलून भागवत कराड यांना मंत्रीपद दिल्यामुळे आधीच नाराज असलेल्या मुंडे समर्थकांनी भागवत कराड परळीत दाखल घोषणाबाजी सुरू केली. या प्रकारावर पंकजा मुंडे चांगल्याच भडकल्या.
'अंगार-भंगार घोषणा काय देताय , तुमच्यावर हेच संस्कार आहेत का ?' जनआशीर्वाद यात्रेदरम्यान पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या.#pankajamunde#pritammundepic.twitter.com/08UcCW14hP
— Lokmat (@MiLOKMAT) August 16, 2021
आज सकाळी भागवत कराड पंकजा मुंडेंच्या परळी येथील घरी दाखल झाले. यावेळी पंकजा यांच्या घराबाहेर मुंडे समर्थकांनी पंकजा आणि प्रितम यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली. 'पंकजा मुंडे अंगार है, बाकी सब भंगार है...', अशा स्वरुपाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी सुरू केल्या. यानंतर भागवत कराड यांच्यासमोरच गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे चांगल्याच संतापल्या. 'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहे का? इथे काय दुसऱ्या पक्षाचा कार्यक्रम सुरु आहे का? हे वागणं मला चालणार नाही, असंच जर वर्तन असेल तर परत मला भेटायला येऊ नका, अशा शब्दात पंकजा यांनी कार्यकर्त्यांना झापलं.
पुन्हा समोर आली कार्यकर्त्यंची नाराजी ?
काही दिवसांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात पंकजा मुंडे यांच्या भगिनी खासदार प्रितम मुंडे यांच्या नावाची चर्चा असतानाही त्यांना डावलून डॉ. भागवत कराड यांना मंत्रीपद देण्यात आलं. तेव्हा मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी उमटली होती. ही नाराजी वाढून भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनामाे दिले होते. पण, पंकजा मुंडेंनी मुंबईत या नाराज समर्थकांना बोलावून त्यांची समजूत काढत राजीनामे अमान्य केले होते. आता परत आजच्या घटनेमुळे समर्थकांची नाराजी पुन्हा समोर आली आहे.
भव्य जन आशिर्वाद यात्रा
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) August 15, 2021
दि. १६ ते २१ ऑगस्ट, २०२१
प्रारंभ ता. परळी जि. बीड pic.twitter.com/k2WPLwrVCg
16 ते 21 ऑगस्टदरम्यान जनआशीर्वाद यात्रा
केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी ट्विटरवरुन जनआशीर्वाद यात्रेची घोषणा केली. 'मुंडे साहेबांचा आशिर्वाद व जनतेचा पाठिंब्या मुळेच आज इथवर पोहोचलो, येत आहे जनतेचा आशिर्वाद घ्यायला. भव्य जनआशिर्वाद यात्रा-दि. 16 ते 21 ऑगस्ट 2021', असं ट्विट करुन भागवत कराड यांनी या जनआशीर्वाद यात्रेची माहिती दिली.