Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घराण्याचा तरी मान राखावा”; देवेंद्र फडणवीसांचे शरसंधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 12:58 PM2021-04-05T12:58:49+5:302021-04-05T13:02:58+5:30
BJP Devendra Fadnavis Demand HM Anil Deshmukh Resignation: CBI चौकशीत सगळं उघड होईल. CBI चौकशी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्र कसं खोटं आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला असं सांगत फडणवीसांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मुंबई – राज्यात सध्या सुरु असणाऱ्या गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली आहे, ती या पदाला शोभणारी नाही, सचिन वाझेची पहिल्यांदा पाठराखण केली, त्यानंतर वाझे प्रकरणात जे काही समोर आलं तेव्हापासून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं नाही. माध्यमांसमोर मुख्यमंत्री कोणत्याही प्रकरणावर भाष्य करत नाही हे आश्चर्य आहे. मुख्यमंत्र्यांचं मौन आश्चर्यचकीत करणारं आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे.(BJP Devendra Fadnavis Target CM Uddhav Thackeray over High court ordered HM Anil Deshmukh CBI Probe)
परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता, हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत, या निर्णयाचं स्वागत करताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पदाचा मान राखत, ज्या घराण्यातून ते येतात त्याचा मान राखत त्यांनी या प्रकरणात भूमिका घेतली पाहिजे. अन्यथा त्यांच्याविरोधात जनतेमध्ये संशय निर्माण होईल असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
गृहमंत्री अनिल देशमुखांना HC चा दणका; १०० कोटी वसुलीच्या आरोपांची CBI चौकशी होणार!
अनिल देशमुखांनी पदावर राहणं योग्य नाही
गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा घेतलाच पाहिजे. अनिल देशमुखांनी या पदावर राहणं योग्य नाही. चौकशीतून ते निर्दोष बाहेर पडले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेता येईल. हायकोर्टाने अतिशय योग्य निर्णय दिला आहे. १५ दिवसांत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या चौकशीत काही दोष आढळला तर FIR नोंदवला जावा. हफ्ते वसुलीचं काम सरकारमधील मंत्र्यांच्या आशीर्वादाने होत होतं. याबद्दल हायकोर्टाने कडक पाऊल उचललं आहे. त्या निर्णयाचं स्वागत करतो, CBI चौकशीत सगळं उघड होईल. CBI चौकशी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. रश्मी शुक्ला अहवाल, परमबीर सिंग यांचे पत्र कसं खोटं आहे हे भासवण्याचा प्रयत्न केला असं सांगत फडणवीसांनी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली.
आरशात नव्हे तर CCTV मध्ये सचिन वाझेनं स्वत:ला पाहिलं; पोलीस कंट्रोल रुममध्ये ‘त्या’ दिवशी काय घडलं?
शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
हायकोर्टाच्या निर्णयावर शरद पवारांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, ते मोठे नेते आहेत, एखाद्या पक्षानं नैतिकता पाळली पाहिजे. ती मोठ्या नेत्याची जबाबदारी असते. कोर्टाने अनिल देशमुखांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा असेल ते शरद पवार घेतील. त्या पक्षातील निर्णय शरद पवारांशिवाय दुसरा कोणी घेऊ शकत नाही त्यामुळे शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.