Param bir Singh: "देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर 'ते' पत्र समोर आले हा योगायोग नक्कीच नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:50 AM2021-03-22T03:50:39+5:302021-03-22T03:51:05+5:30
निलंबित केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा काहीही संबंध नाही. परमबीर सिंग यांनीच वाझेंना सेवेत घेतले
नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतर पत्राद्वारे केलेले आरोप गंभीर आहेत. पण ते पत्र देवेंद्र फडणवीस दिल्लीत आल्यानंतर समोर आले, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असताना शरद पवार यांनी रविवारी दुपारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
पवार म्हणाले, परमबीर सिंग मलाही भेटले होते. पण, त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणे मांडताना माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे म्हटले होते. त्यापलीकडे त्यांनी मला काहीही सांगितलं नाही. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, पवार यांनी सांगितले.
निलंबित केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा काहीही संबंध नाही. परमबीर सिंग यांनीच वाझेंना सेवेत घेतले. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला आहे. पण यात पैसे कुणाकडे दिले जात होते हे नमूद करण्यात आलेलं नाही. शिवाय, माझ्याकडे आलेल्या पत्रावर त्यांची सही नाही, असे पवार यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर ते पत्र समोर आले हा योगायोग नक्कीच नाही. एकूणच हे प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याने ज्युलिओ रिबेरो यांच्या सारख्या एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही, असेही पवारांनी स्पष्ट केले.
शिवसेनेशी वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे
शिवसेनेशी सचिन वाझेंचे संबंध जोडणे चुकीचे आहे. वाझेंना शिवसेनेशी चिटकवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. वाझेंना आल्या आल्या जबाबदारी कोणी दिली हे हळूहळू कळेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवर चर्चा करण्यासाठी पंढरपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोणाला तरी खूश करण्यासाठी परमबीर सिंगांचा लेटर बाॅम्ब आहे. १७ वर्षांनंतर परमबीर यांच्या सहीनेच मोठ्या प्रकरणाचे तपास वाझेंकडे देण्यात आले आहेत. संबंधित स्फोटके ठेवण्यासाठी जबाबदार कोण आहे, हे शोधण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणार नाही, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.