Parambir Singh letter: लेटर बाॅम्ब! परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर स्फोटक आरोप; शरद पवारांनाही होती कल्पना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 03:02 AM2021-03-21T03:02:32+5:302021-03-21T03:05:47+5:30

Sachin Vaze, Ex Mumbai Police Commissioner Target home minister Anil Deshmukh: मुंबई आयुक्तपदावरून तीन दिवसांपूर्वी उचलबांगडी करण्यात आलेल्या सिंग यांनी शनिवारी मौन सोडले

Parambir Singh letter explosive allegations against HM Anil Deshmukh Sharad Pawar also known | Parambir Singh letter: लेटर बाॅम्ब! परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर स्फोटक आरोप; शरद पवारांनाही होती कल्पना 

Parambir Singh letter: लेटर बाॅम्ब! परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर स्फोटक आरोप; शरद पवारांनाही होती कल्पना 

googlenewsNext

मुंबई : ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ ईयर’च्या पुरस्कार सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली ही नियमित प्रशासकीय नसून काही अक्षम्य गोष्टी घडल्याने केली असल्याचे म्हटले होते. या मुद्यावरून नाराज परमबीर सिंग यांनी शनिवारी थेट गृहमंत्र्यांवरच लेटर बॉम्ब टाकून १०० कोटी रुपयांच्या खंडणीखोरीचा आरोप करीत महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. मात्र, गृहमंत्री देशमुख यांनी या आरोपांचे लगेच खंडन केले असून, कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा खोटा आरोप केल्याचे टि्वट त्यांनी केले आहे. 

मुंबई आयुक्तपदावरून तीन दिवसांपूर्वी उचलबांगडी करण्यात आलेल्या सिंग यांनी शनिवारी मौन सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर पत्र लिहून त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. हे पत्र त्यांनी राज्यपालांच्या कार्यालयालाही धाडले आहे.

पत्रातील प्रमुख आरोप  

  • दर महिन्याला खंडणीद्वारे १०० कोटी रुपये जमा करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला आदेश दिले होते.
  • गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवायचे. मला वा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना बंगल्यावर बोलवायचे. पैसे गोळा करण्याचे टार्गेट द्यायचे. 
  • सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करायला सांगितलं. 
  • फेब्रुवारीच्या मध्यावर वाझेंना शासकीय निवासस्थानावर बोलवून गृहमंत्री देशमुखांनी ही सूचना केली. त्यावेळेस देशमुखांचे पर्सनल सेक्रेटरी पलांडे हेही हजर होते. एक दोन घरातले स्टाफ मेंबरही हजर होते.
  • शंभर कोटी गोळा करण्यासाठी काय करायचं हेही देशमुखांनी सांगितलं. त्यात देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट आहेत. प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरी महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा करता येईल.

पैसे गोळा करण्यासाठी पोलिसांचा उपयोग 
टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते.

मुलाखतीतील धागा पकडून पत्रात केले गंभीर आरोप
‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ ईयर’ पुरस्कार सोहळ्यात गृहमंत्री देशमुख यांनी दिलेल्या मुलाखतीत परमबीर सिंग यांच्याकडून गंभीर चुका झाल्याने त्यांना आयुक्तपदावरून हलविण्यात आले. ही नियमित बदली नव्हती, असे स्पष्ट केले होते. परमबीर सिंग यांनी तोच धागा पकडून गृहमंत्री व त्यांचे सचिव संजीव पलांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

डेलकरप्रकरणी दबाव
खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्यावर सातत्याने दबाव आणला होता, असेही सिंग यांनी म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीच गृहमंत्री देशमुख व राज्य सरकारची पोलखोल केली. देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आणखी किती पुरावे हवेत. - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

पवारांना कल्पना 
अँटिलिया प्रकरणात ब्रिफिंग देताना एका बैठकीत मी आपल्याला गृहमंत्र्यांची गैरवर्तणूक निदर्शनात आणून दिली होती. त्याची कल्पना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही दिली होती, असेही सिंग यांनी म्हटले आहे.देशमुख यांनी केले खंडन  कारवाईपासून वाचण्यासाठी व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा खोटा आरोप केला आहे. 

अंबानी प्रकरणी, हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदारे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता तपासातून दिसते आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी सिंग यांनी हा खोटा आरोप केला. अनिल देशमुख, गृहमंत्री

 

Web Title: Parambir Singh letter explosive allegations against HM Anil Deshmukh Sharad Pawar also known

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.