देहूत पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे आले आमनेसामने, पुढे घडलं असं काही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:31 PM2019-03-22T17:31:45+5:302019-03-22T17:37:31+5:30
निवडणूक तात्पुरती असली तरी त्यामुळे उमटणारे पडसाद मात्र आयुष्यभरासाठी असतात. याचाच अनुभव देहू येथे आला असून महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळमधल्या लढतीचे उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार शुक्रवारी समोरासमोर आले.
पुणे : निवडणूक तात्पुरती असली तरी त्यामुळे उमटणारे पडसाद मात्र आयुष्यभरासाठी असतात. याचाच अनुभव देहू येथे आला असून महाराष्ट्रातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मावळमधल्या लढतीचे उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार शुक्रवारी समोरासमोर आले. मात्र यावेळी बोलणे तर दूरच पण एकमेकांकडे बघणेही त्यांनी टाळले.
निवडणुका जाहीर झाल्यावर मतदारसंघातल्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढायला सुरुवात होते. पार्थ यांनी मागील आठवड्यात कार्ला गडावरील देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर तुकाराम बीज सोहळ्याचा मुहूर्त साधून ते देहूमध्ये दर्शनासाठी आले होते. मात्र त्यांच्याआधी तिथे सध्याचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. अटीतटीच्या लढतीतील हे दोन उमेदवार समोर आल्यावर एकमेकांशी बोलतील का किंवा शुभेच्छा देतील का असे प्रश्न उपस्थितांच्या मनात निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी कोण पार्थ पवार अशी टीका खासदार बारणे यांनी केली होती. त्यावर ‘मी कामातून पार्थ कोण हे दाखवून देईन, असे प्रत्युत्तर पवार यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर बारणे आणि पवार या ठिकाणी एकत्र आल्यानंतर दोघे एकमेकांशी काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, दोघांनीही एकमेकांशी संवाद साधला नाही.उत्सवाची मुख्य आरती सुरु झाल्यावर हे दोघे चक्क एकमेकांच्या शेजारी दहा मिनिटांपेक्षा अधिक काळ उभे होते. यावेळेत त्यांनी चकार शब्दही उच्चारला नाही.आरतीनंतर तुकोबांचे दर्शन घेऊन दोघेही मंदिराबाहेर पडले.
पवार प्रथमच बीजसोहळ्यात
पुणे जिह्यातील तीर्थक्षेत्राच्या सोहळ्यात पवार घराणे मात्र, सहभागी होत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. मावळ लोकसभेची रणधुमाळी सुरू झाल्यामुळे तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यावर पार्थ पवार यांनी सुरूवात केली आहे. आजोबा आणि वडिलांची परंपरा खंडीत करून पार्थ पवार मतांचा जोगवा मागण्यासाठी देहूतील संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यात सहभागी झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.