धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर, लवकरच निर्णय घेऊ; शरद पवारांचे मोठे संकेत
By कुणाल गवाणकर | Published: January 14, 2021 02:21 PM2021-01-14T14:21:24+5:302021-01-14T15:16:33+5:30
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची सूचक प्रतिक्रिया; लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती
मुंबई: गायिकेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबद्दलची भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी माझ्याकडे सविस्तर माहिती दिली आहे. आता पक्षातील वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलून याबद्दलचा निर्णय घेतला जाईल, असं शरद पवार म्हणाले.
अखेर मंत्री धनंजय मुंडेंना माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी घेरलं; बलात्काराच्या आरोपावर म्हणाले...
'धनंजय मुंडेंनी काल माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांची बाजू सविस्तर मांडली. त्यांचा काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध आला. आता त्याबद्दल पोलीस ठाण्यात काही तक्रारी दाखल झाल्या आहेत. चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणावरून व्यक्तिगत स्वरुपाचे हल्ले होणार याची बहुधा त्यांना पूर्वकल्पना असावी. त्यामुळे ते आधीच कोर्टात गेले. त्यामुळे कोर्टाच्या विषयावर मी बोलणार नाही,' असं शरद पवार यांनी सांगितलं.
धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवार यांनी सोडले मौन; राष्ट्रवादीची भूमिका केली स्पष्ट
'धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकाऱ्यांशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, विचारविनियम झाल्यावर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल. मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा पोलिसांकडून तपास होईलच. मात्र त्याआधी पक्ष म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागेल,' असं पवार म्हणाले.
मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल, विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं का, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर आधी पक्षातल्या वरिष्ठ सहकाऱ्यांशी बोलू. मग मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू, असं उत्तर पवार यांनी दिलं. याप्रकरणी निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्र्यांची वाट पाहणार नाही. पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मात्र तो घेत असताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ. यासोबतच आरोपांचं गांभीर्यदेखील लक्षात घेऊ, या गोष्टीही लक्षात घेऊ, असं पवार यांनी सांगितलं.