वा रे घोषणापत्र... चक्क ताडीला कायदेशीर मान्यता, तर '8 वी पास'वाला पोलीस भरतीस पात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 02:18 PM2019-04-08T14:18:25+5:302019-04-08T14:19:13+5:30
लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रीय जनता दला(राजद)नं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
पाटणाः लोकसभा निवडणुकीसंदर्भात राष्ट्रीय जनता दला(राजद)नं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पाटण्यातल्या पक्ष कार्यालयात तेजस्वी यादवसह दिग्गज नेत्यांनी या जाहीरनाम्याची घोषणा केली. सामाजिक न्यायाच्या दिशेनं आम्ही जात असल्याचंही तेजस्वी यादव यांनी सांगितलं आहे. लालूप्रसाद यादव यांनीही गरिबांच्या उद्धारासाठी भरीव कार्य केलं आहे. राजदच्या घोषणापत्रात उल्लेख करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये ताडीचाही समावेश आहे. राजदनं सत्तेत आल्यास ताडीला कायदेशीर मान्यता देणार असल्याचंही जाहीर केलं आहे. तसेच जातीय आधारावर जनगणना करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
लोकसंख्येचा विचार केल्यास आरक्षणाच्या टक्काही वाढायला हवा. राजदनं स्वतःच्या जाहीरनाम्यात मंड आयोगाच्या शिफारशी पुन्हा लागू करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये बढतीतील आरक्षण कायम राहणार आहे. तेजस्वी म्हणाले, 2021पर्यंत सर्व जातीच्या लोकांची जनगणना केली जाईल. तसेच केंद्रातील सत्तेत सहभागी झाल्यास लोकांना आपल्याच राज्यात नोकऱ्या उपलब्ध करून देणार आहे. जेणेकरून जनतेला नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जाता येणार नाही.
प्रवासी बिहारी नागरिकांसाठी हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात येणार आहे. सरकारमधील रिक्त पदे तात्काळ भरणार आहे. जाहीरनाम्यात ताडीला कायदेशीर मान्यता देणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलिसांच्या भरतीसाठी 7वी आणि आठवी ही शिक्षणाची अट ठेवणार असल्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यातून देण्यात आलं आहे. आमचं सरकार आल्यास ताडी विकणं आणि पिण्याची सुविधा मोफत होणार आहे.