काळ्या रंगाचा भाजपाला धसका ; अमित शहांच्या सभेत काळा रंग परिधान करणाऱ्यांना राेखले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 02:25 PM2019-04-20T14:25:09+5:302019-04-20T14:42:17+5:30
यंदाच्या निवडणुकीत भाजपाने काळ्या रंगाचा चांगलाच धसका घेतला आहे.
बारामती : यंदाच्या निवडणुकीत भाजपाने काळ्या रंगाचा चांगलाच धसका घेतला आहे. काल बारामती येथे झालेल्या अमित शहा यांच्या सभेदरम्यान काळ्या रंगाचा शर्ट आणि टी शर्ट परिधान करणाऱ्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. काळ्या रंगाचा शर्ट, टी शर्ट परिधान केलेल्या नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव सभेच्या ठिकाणी जाण्यापासून राेखण्यात आले. नागरिकांचे रुमाला देखील तपासण्यात आले. त्यामुळे ज्यांनी काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला हाेता, त्यांची चांगलीच निराशा झाली.
काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची बारामती येथे सभा पार पडली. सभेला आलेल्या नागरिकांची कसून तपासणी करण्यात येत हाेती. त्यातच ज्या काेणी काळा ड्रेस परिधान केला हाेता, त्यांना सभेला जाऊ देण्यात आले नाही. त्याचबराेबरच नागरिकांचे रुमाल देखील तपासण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव जरी हे केले असल्याचे पाेलिसांनी सांगितले असले, तरी भाजपाने काेणी काळा रंग दाखवून निषेध करु नये याचा चांगलाच धसका घेतल्याचे समाेर आले आहे.
या आधी देखील माेदींच्या सभांमध्ये काळा रंगाचे कपडे असणाऱ्यांना माेदींच्या सभेला जाण्यापासून राेखण्यात आले हाेते. तसेच माेदींच्या ताफ्याला काळा झेंडा दाखवण्याचा प्रयत्न झाला हाेता. त्यामुळे अमित शहांच्या प्रचार सभेत काेणीही काळा रंग दाखवून निषेध करु नये म्हणून खबरदारी घेण्यात आली हाेती.