'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 05:27 PM2021-05-29T17:27:40+5:302021-05-29T17:39:31+5:30

Mamata Banerjee And Narendra Modi : ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं आहे. 

pm modi and mamata banerjee meeting controversy mamata responds bjp allegation bengal yaas cyclone meeting | 'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

'त्या' आरोपावर ममतांचं उत्तर; म्हणाल्या मोदींनी मलाच पाहायला लावली वाट; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Next

नवी दिल्ली - यास चक्रीवादळाचा फटका बसलेल्या पश्चिम बंगालमधील भागाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हवाई पाहणी दौरा केला. यानंतर आढावा बैठकही घेतली. मात्र, यावेळीही ममता बॅनर्जी सरकार आणि केंद्रातील वाद शमलेला दिसला नाही. यास चक्रीवादळाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान मोदी, राज्यपाल जयदीप धनखर यांना ताटकळत ठेवल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली. यावरून भाजपा नेत्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली होती. यानंतर आता ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांच्या बैठकीवेळी नेमकं काय घडलं, हे विस्तृतपणे सांगितलं आहे. 

"जनतेच्या भल्यासाठी मी पंतप्रधानांचे पाय धरायलाही तयार आहे पण अशा प्रकारे माझा अपमान करू नका" अशी भूमिका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.  "आम्ही 'सागर'ला पोहचलो तेव्हा आम्हाला सूचना मिळाली की आम्हाला 20 मिनिटे वाट पाहावी लागेल कारण पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर उतरण्यासाठी वेळ लागणार होता. पंतप्रधानांना आमच्या वेळेच्या नियोजनाची अगोदरच माहिती देण्यात आली होती. त्यानंतरही आम्हाला त्यांची वाट पाहावी लागली. परंतु, आम्ही जेव्हा बैठकीच्या ठिकाणी पोहचलो तेव्हा बैठक सुरू झाली होती आणि पंतप्रधानही तिथं उपस्थित होते" असं ममता यांनी म्हटलं आहे.

"पंतप्रधानांना सन्मान देण्यासाठी मी मुख्य सचिवांसोबत बैठकीत पोहचले होते. मुख्य सचिवांना सोबत येण्यास मी विनंती केली कारण ते आमच्या प्रशासनाचे प्रमुख आहेत. पण, बैठकीस्थळी आम्ही पोहचल्यानंतर आम्हाला वाट पाहावी लागेल असं सांगण्यात आलं. माझ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षारक्षकांना एका मिनिटासाठी भेटण्याची परवानगी मागितली परंतु, पंतप्रधानांच्या एसपीजीनं आम्हाला एक तास वाट पाहावी लागेल, असं सांगितलं. त्यांनी आम्हाला काही रिकाम्या खुर्च्याही दाखवल्या. परंतु, त्यावेळी तिथं बसण्यात काहीही अर्थ नव्हता" असंही म्हटलं आहे.

"त्यानंतर जेव्हा आम्ही बैठकीत दाखल झालो तेव्हा मी त्यांना सांगितलं की अहवाल सोपवण्यासाठी आम्हाला एक मिनिट देण्यात आला आहे. परंतु, एसपीजीकडून ही बैठक एक तास चालणार असल्याचं सांगण्यात आलं. दीघाचं वातावरण खराब असल्यानं आम्हाला तिकडे निघावं लागेल, असं आम्ही पंतप्रधानांना सांगितलं. आमचा पुढचा कार्यक्रम ठरलेला होता त्यामुळे पंतप्रधानांची भेट घेऊन आम्ही त्यांच्याकडे अहवाल सोपवला आणि त्यांची परवानगी घेऊनच तिथून निघालो" असंही ममता दीदींनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; कधी कधी तुम्हीही थोडी वाट पाहा" 

भाजपाकडून ममतांवर हल्लाबोल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (TMC Mahua Moitra) यांनी भाजपाला आता प्रत्युत्तर दिलं आहे. "भारतीय 15 लाखांसाठी सात वर्षांपासून थांबलेत; तुम्हीही थोडी वाट पाहा" असं म्हणत मोईत्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. महुआ मोईत्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. "30 उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय 15 लाख रुपयांची सात वर्षांपासून वाट पाहत आहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लसीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघावी लागत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा" असं म्हणत महुआ मोईत्रा यांनी केंद्र सरकार आणि भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. 

 

Web Title: pm modi and mamata banerjee meeting controversy mamata responds bjp allegation bengal yaas cyclone meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.