बड्या मंत्र्यांचा राजीनामा, पण मोदींच्या मंत्रिमंडळातील या सहा चेहऱ्यांचं होऊ शकतं प्रमोशन, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 03:32 PM2021-07-07T15:32:50+5:302021-07-07T15:35:55+5:30
PM Modi Cabinet Expansion: सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या सहा मंत्र्यांचे प्रमोशन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच या मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार किंवा राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेटमंत्रिपदावर नियुक्ती मिळू शकते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा विस्तार होणार असल्याने आज राजधानी दिल्लीतील राजकीय वर्दळ वाढली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्ताराबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. (PM Modi Cabinet Expansio) दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक बड्या नेत्यांचा राजीनामा घेण्यात आल्याने आता नव्या मंत्रिमंडळाबाबतची उत्सुकता अधिकच वाढली आहे. दरम्यान, सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या सहा मंत्र्यांचे प्रमोशन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच या मंत्र्यांना स्वतंत्र प्रभार किंवा राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेटमंत्रिपदावर नियुक्ती मिळू शकते. (Big ministers resign, but these six faces in Modi's cabinet could be promoted)
नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये ज्या मंत्र्यांना प्रमोशन मिळू शकते त्यांच्यामध्ये अनुराग ठाकूर, जी. किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, हरदीप सिंग पुरी, आर.के.सिंह, मनसुख मांडविया यांचे नाव सर्वात पुढे आहे. या सर्वांच्या बढतीमागे विविध राज्यांत होणाऱ्या निवडणुका हे महत्त्वाचे कारण आहे. पुढच्या काळात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, गोवा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
बढती मिळणाऱ्या नेत्यांच्या यादीत हरदीप सिंग पुरी यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांच्याकडे सध्या तीन मंत्रालयांचा भार आहे. त्यामध्ये नागरी हवाई वाहतुक मंत्री, शहरी विकास मंत्री आणि वाणिज्य मंत्रालयाचा प्रभार आहे. ते शीख आहेत. तसेच पंजाबमधील विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांचं प्रमोशन होणार आहे.
या यादीत दुसरं नाव हे अनुराग ठाकूर यांचं. अनुराग ठाकूर हे सध्या वित्तराज्यमंत्री आहेत. मात्र पुढील दीड वर्षांने हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मंत्रिपदामध्ये बढती मिळू शकते. अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशमधील खासदार असून, त्यांचे वडील प्रेमकुमार धुमल हे भाजपाचे बडे नेते आहेत. धुमल यांनी तीन वेळा हिमाचलचे मुख्यमंत्रिपद भूषवले आहे.
याशिवाय मनसुख मांडविया, पुरुषोत्तम रुपाला यांनाही बढती मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमधील हे नेते लेवा पटेल समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांनाही स्वतंत्र प्रभार असलेलं राज्यमंत्रिपद मिळू शकतं. त्याशिवाय ऊर्जा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार सांभाळत असलेल्या आर.के. सिंह यांनाही कॅबिनेट मंत्रिपदी बढती मिळू शकते.