PM नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून मुख्यमंत्री योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत; जाणून घ्या यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 09:34 AM2021-06-06T09:34:27+5:302021-06-06T09:37:03+5:30
भाजपात सर्वकाही ठीक नाही अशी चर्चा सुरू झाली. काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात योगी कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(UP CM Yogi Adityanath) यांचा शनिवारी वाढदिवस झाला. अनेक राजकीय नेत्यांनी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योगी आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) नेहमी आपल्या सरकारमधील मंत्री, पक्षाचे नेते, विरोधी पक्षातील नेते यांना त्यांच्या वाढदिवशी ट्विटरवरून शुभेच्छा देतात. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला उधाण आलं.
भाजपात सर्वकाही ठीक नाही अशी चर्चा सुरू झाली. काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात योगी कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपा संघटनेचे महासचिव बीएल संतोष आणि लखनौ येथील मंत्री, पक्षाचे नेते यांच्यात वारंवार बैठकींचा सिलसिला सुरू आहे. त्यानंतर महासचिव बीएल संतोष यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. मागील काही महिन्यांपासून भाजपा नेते आणि आमदार उघडपणे योगी सरकारच्या कामाकाजावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे या भेटींना महत्त्व प्राप्त झालं आहे.
परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून योगी आदित्यनाथ यांना शुभेच्छा न दिल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांच्यावर नाराज आहेत अशी चर्चा होती. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून कोणत्याही नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. देशात कोरोनाची दुसरी लाट असल्याने पंतप्रधानांनी असं केल्याचं सांगितले गेले. ५ जून रोजी योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस असतानाही त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या नाहीत.
माहितीनुसार, १८ मे रोजी केंद्रीय थावरचंद गहलोत, २४ मे रोजी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, ५ मे रोजी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, ३ मे रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, २७ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही वाढदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या नाहीत.