पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला नव्या मंत्र्यांचा वर्ग; काय करावं अन् काय नाही? सांगितला ‘कानमंत्र’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 12:39 PM2021-07-09T12:39:55+5:302021-07-09T12:41:27+5:30
Narendra Modi Cabinet Reshuffle:या बैठकीत कोरोना स्थितीचाही उल्लेख करण्यात आला. पर्यटनस्थळी होणारी गर्दी आणि निष्काळजीपणा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली.
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्रिमंडळाचा वर्ग घेतला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यात तब्बल ४३ मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गुरुवारी या सर्व मंत्र्यांनी आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्र्यांना मार्गदर्शन केले. यात मंत्र्यांनी काय करावं आणि काय नाही याबाबत मोदींनी कानमंत्र दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जुन्या मंत्र्यांना व्यवस्थेमुळे हटवण्यात आलं आहे. त्याचा संबंध त्यांच्या क्षमतेशी नाही. नवीन मंत्र्यांनी जुन्या मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडून अनुभवाचा फायदा घ्यावा. त्याचसोबत मंत्र्यांनी मीडियाच्या विनाकारण वक्तव्यं न करण्याचा सल्लाही मोदींनी दिला आहे. तुमचं काम बोलायलं हवं, ना तुमचा चेहरा. तुमची सर्व उर्जा विभागाच्या कामासाठी लावा. आगामी अधिवेशनात सर्व मंत्र्यांनी पूर्ण तयारीने संसदेत यावं. महत्त्वाचं म्हणजे सर्व मंत्र्यांनी सकाळी ९.३० वाजता कार्यालयात आलं पाहिजे असं मोदींनी सांगितले.
या बैठकीत कोरोना स्थितीचाही उल्लेख करण्यात आला. पर्यटनस्थळी होणारी गर्दी आणि निष्काळजीपणा यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता लोकं घराबाहेर पडत आहेत. परंतु कोरोना महामारीचा धोका अद्याप टळला नाही हे सर्वांनी ध्यानात ठेवावं. व्हायरस सातत्याने म्यूटेट बदलत आहे. मागील काही दिवसांपासून मी गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या लोकांचे फोटो, व्हिडीओ बघत आहे. हे चांगले दृश्य नाही. या प्रकारापासून आपल्याला घाबरायलं हवं. अशा बेजबाबदारपणाला कुठेही थारा दिला जाणार नाही असं मोदींनी बजावलं. एक छोटी चूक आपल्यासाठी संकट बनू शकते. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करायला हवे.
काय करावं?
सकाळी ९.३० वाजता सर्व मंत्र्यांनी कार्यालयात यावं
स्वत:च्या कामावर फोकस करा
जुन्या मंत्र्यांना भेटून त्यांच्याकडून अनुभवाचा फायदा घ्या
काय करू नका?
विनाकारण वादग्रस्त विधानं टाळा
फक्त चेहरा चमकवण्याचं टाळा, काम करा
संसदेत अपूर्ण तयारीने कधी येऊ नका
‘या’ मंत्र्यांना मिळालं प्रमोशन
अनुराग ठाकूर, जी. के रेड्डी, मनसुख मंदाविया, किरण रिजिजू, आर.के सिंह, हरदीप सिंह पुरी आणि पुरुषोत्तम रुपाला यांना प्रमोशन मिळालं आहे. हे सर्व राज्यमंत्री होते आता या सातही जणांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.