पोलीस बदल्या, पदोन्नतीचे रॅकेट, देवेंद्र फडणवीसांचा आरोप; केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 06:21 AM2021-03-24T06:21:17+5:302021-03-24T06:21:51+5:30
या अहवालाच्या पुष्ट्यर्थ ६.३ जीबी डेटा फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे सादर केला आणि याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली.
मुंबई / नवी दिल्ली : पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीसंदर्भातील रॅकेटचा २५ ऑगस्ट २०२० रोजीच अहवाल दिलेला असताना दोषींवर कारवाई न करता हा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांनाच बाजूला करण्यात आले, असा आरोप करत यासंबंधीचा तत्कालीन गुप्तवार्ता प्रमुख, पोलीस महासंचालक आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यातील कथित पत्रव्यवहार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केला.
या अहवालाच्या पुष्ट्यर्थ ६.३ जीबी डेटा फडणवीस यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे सादर केला आणि याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. या डेटामध्ये अनेक पोलीस अधिकारी, राजकीय नेते यांची नावे असल्याचा दावा करत यातील केवळ पत्रव्यवहार उघड करीत असून अधिक तपशील उघड करणार नाही, असे फडणवीस यांनी मुंबईत सांगितले. पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटप्रकरणी गुप्तवार्ता आयुक्तांनी एक अहवाल तयार केला होता. असे करण्यापूर्वी त्यांनी एसीएस-गृह यांची रीतसर परवानगीही घेतली होती. हा अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालकांनी गृह विभागाकडे सादर केला. या अहवालात सीआयडी चौकशीची शिफारस केली होती. पण, तसे न करता रश्मी शुक्ला यांचीच उचलबांगडी झाली. या अहवालात ज्या नियुक्त्या व पदोन्नतींसाठी देवाणघेवाणीचा उल्लेख आहे, तीच यादी प्रत्यक्षात निघाली. त्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्यावर सुद्धा दबाव होता. पण, त्यांनी तो झुगारला, असे फडणवीस म्हणाले.
सीलबंद पुरावे
महाराष्ट्र पोलीस दलातील बदल्या आणि पदोन्नतीच्या रॅकेटसंदर्भातील संपूर्ण माहिती, पुरावे सीलबंद लिफाफ्यात आपण केंद्रीय गृहसचिवांना दिले. ही संपूर्ण माहिती आणि पुरावे पडताळून सुयोग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहसचिवांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.