प्रार्थनास्थळे उघडण्याचे ‘राजकीय’ श्रेय : भाजप-सेनेत चढाओढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:45 AM2020-11-17T05:45:02+5:302020-11-17T05:45:27+5:30
कुठे महाआरती तर कुठे आनंदोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘लॉकडाऊन’नंतर महाराष्ट्रात सोमवारी प्रथमच धार्मिकस्थळे उघडण्यात आली. शहरातील काही मंदिरांमध्ये सामान्य भाविकांपेक्षा राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी दिसून आली. आमच्यामुळेच प्रार्थनास्थळे उघडली असल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. शिवसेनेतर्फे महाआरती तर भाजपतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला व प्रार्थनास्थळांचे श्रेय लाटण्याची चढाओढ सामान्यांनादेखील दिसून आली.
टेकडी गणेश मंदिरातशिवसेनाच्या पक्ष पदाधिकाऱ्यांनी सकाळच्या वेळी महाआरती केली व तेथे पोहोचलेल्या भाविकांना प्रसादाचे वितरण केले. याचप्रकारे सूर्यनगरस्थित दुर्गा मंदिर, गरीब नवाजनगर येथील शीतला माता मंदिर, राममंदिर, तेलंगखेडी हनुमान मंदिर आणि नागमंदिर येथेदेखील महाआरती करण्यात आली.
दुसरीकडे मागील काही दिवसापासून प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या भाजपातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील विविध मंदिरांसमोर हे आयोजन झाले. आमच्या पक्षाच्या आंदोलनामुळेच सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांनी केला. वर्धा मार्गावरील साईमंदिरासमोर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. तर पोद्दारेश्वर राममंदिरात आरतीनंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भवानी माता मंदिर येथेदेखील जल्लोष करण्यात आला.
मनसेचादेखील दावा
भाजप-सेनेसोबतच मनसेनेदेखील प्रार्थनास्थळे त्यांच्याच पक्षामुळे उघडल्याचा दावा केला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मनसे पदाधिकारी यांनी गणेशपेठ स्थित आग्याराम देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेत पूजा अर्चना केली व जनतेला कोरोना संकटापासून मुक्ती मिळावी याकरिता प्रार्थना केली.