हिंगोलीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 05:13 AM2019-04-15T05:13:39+5:302019-04-15T05:14:42+5:30

लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आता प्रचाराला खरी गती आली आहे.

Political mudslide in Hingoli | हिंगोलीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार

हिंगोलीत राजकीय चिखलफेक जोरात, दोन्ही प्रमुख उमेदवार बेजार

Next

- विजय पाटील
लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. आता प्रचाराला खरी गती आली आहे. कमी दिवस हाती राहिल्याने उमेदवार, त्यांचे नातेवाईक पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. प्रमुख पक्षांची एकेक मोठी सभाही झाली आहे. राजकीय वातावरण ढवळून निघाल्याने आता टक्कर आणखी काट्याची होणार असल्याचे चित्र आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात दोन्ही प्रमुख उमेदवार नवीन असल्याने त्यांचा कार्यकर्त्यांशी सूर जुळायलाच पहिले काही दिवस लागले. शिवसेनेचे हेमंत पाटील व काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यातच आता काट्याची लढत दिसू लागली आहे. त्यातही प्रचारयंत्रणा राबविताना सुरुवातीला काँग्रेसचे तेवढे नियोजन दिसत नव्हते. दुसरीकडे शिवसेनेची यंत्रणा मात्र नियोजनबद्ध राबविली जात आहे. आता दोन्हीकडेही नियोजनबद्ध प्रचार सुरू झाला आहे. गटातटाच्या भिंती गळून पडल्या आहेत. सोबत राहूनही कोण दगाफटका करेल, याची काहीच शाश्वती नाही. मात्र, कोणालाही दूर सारण्याची ताकद उमेदवारांत तरी नाही.
आतापर्यंत केवळ कुणी उमेदवार दलबदलू, कुणी बाहेरचा तर कुणी कमकुवत असल्याचीच चर्चा होती. आता मात्र मोदी फॅक्टरही जाणवत असून, सेनेचा त्यावरच भर आहे. तर काँग्रेस या फॅक्टरमुळे झालेल्या नुकसानीची माहिती सांगून मतदारांना साद घालत आहे. दोन्हींकडूनही जोरदार राजकीय चिखलफेक होत आहे. यात मतदारांचे मनोरंजन होत आहे. सेनेसाठी पंकजा मुंडे तर राष्ट्रवादीसाठी धनंजय मुंडे यांची सभा झाली. सुरुवातीला काँग्रेस एकतर्फी मैदान मारणार, असे निर्माण झालेले चित्र आता सेनाही गर्दी खेचू लागल्याने धूसर होत चालले आहे. त्यात वंचित आघाडी व बसपामुळे काय गोंधळ होतो, याचे वेगळे कोडे आहे.
वंचित आघाडीच्या मोहन राठोड यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनीही सभा घेतल्या.
पुढील टप्प्यात आणखी मोठ्या नेत्यांच्या सभांचा फड रंगणार आहे. बसपाचाही एकखांबी तंबू डॉ. दत्ता धनवे राबवित आहेत. एक-दोन वगळता इतर पक्षीय अथवा अपक्ष उमेदवारांचा प्रचारात कुठे पत्ता नाही. त्या-त्या भागात फिरत असल्याचे सांगितले जाते.
।भाजपचे फसवे सरकार आता जाणार आहे. जनतेचा या सरकारवरील विश्वास उडाला आहे. प्रचारात लोक हे बोलून दाखवतात. शिवसेनेनेही निष्ठावंतांना डावलून धुळ््याचे पार्सल शिवसैनिकांच्या बोकांडीवर टाकले आहे. आघाडीत मात्र सगळेजण एकदिलाने विजयासाठी झटत आहेत.
- सुभाष वानखेडे, काँग्रेस
>विकासासाठी जनतेला पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार यावे, असे वाटते. शिवसेना व भाजपची सर्व मंडळी जीव ओतून काम करीत आहेत. त्यामुळे शिवसेनेशी गद्दारी केलेल्या वानखेडेंना शिवसैनिक धडा शिकविणार आहे. खा.सातवही पराभवाच्या भीतीने पळून गेले. त्यामुळे विजय निश्चित आहे.
- हेमंत पाटील, शिवसेना
>कळीचे मुद्दे
काँग्रेसच्या प्रचारात अनेक स्थानिक चेहरे अजूनही दिसत नाहीत. शिवाय वंचितही जोराने मैदानात उतरल्याने डोकेदुखी वाढली.
हेमंत पाटील व त्यांच्या पत्नीने पायाला भिंगरी बांधली. तरीही कुठे सेना तर कुठे भाजपची मंडळी अजूनही जीव ओतत नाही.

Web Title: Political mudslide in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.