इच्छुकांचे नेत्यांना ‘पाव....पाव’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 03:05 PM2019-09-15T15:05:55+5:302019-09-15T15:07:25+5:30
पितृपक्षातच रणधुमाळी : अर्ज भरण्याची प्रक्रियाही पितृपक्षात राहणार
- सुदाम देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : आता कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊ शकते. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ही पितृपक्षातच सुरू राहणार आहे. एरव्ही अर्ज दाखल करण्यासाठी पितृपक्ष कधी संपेल, याची इच्छुकांना प्रतीक्षा असते. यंदा मात्र कोणाची इच्छा असो की नसो, सर्वांना पितृपक्षातच अर्ज दाखल केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. त्यामुळे इच्छुकांची थोडी धाकधूक वाढली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणूक रणधुमाळीही पितृपक्षातच होती. २०१४ मध्ये १२ सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाली होती. १५ आॅक्टोबरला मतदान आणि १९ आॅक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल लागला होता. त्यावेळी ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीत पितृपक्ष होता. तशीच परिस्थिती यंदाही राहण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार १६ किंवा १९ सप्टेंबरला आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागल्यानंतर एक-दोन दिवसांनी अधिसूचना प्रसिद्ध होते. त्यानंतर ९ ते १० दिवसापर्यंत अर्ज दाखल करता येतात. १९ सप्टेंबरला किंवा त्याआधी अधिसूचना प्रसिद्ध झाली तर त्यानंतर दहा दिवसात २९ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील. तोपर्यंत पितृपक्ष संपलेला असेल. त्यामुळे पितृपक्ष संपल्यानंतर म्हणजे घटस्थापनेच्या पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या तारखा असू शकतील.
२९ सप्टेंबरला घटस्थापना आहे. आतापासूनच इच्छुकांनी या पितृपक्षाची धास्ती घेतलेली आहे. आधीच पक्षांतरामुळे धास्तावलेले इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी मुहुर्ताच्या प्रतीक्षेत आहेत. पितृपक्षात नेमका कोणता मुहूर्त चांगला असेल, याची चाचणी इच्छुकांकडून सुरू झालेली दिसते.
पितृपक्षात पितर घरी जेवण्यासाठी यावेत, यासाठी ‘पाव पाव’ करीत कावळ््यांना आवाहन केले जाते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी त्यांच्या नेत्यांकडे आता उमेदवारी मिळविण्यासाठी ठाण मांडलेले आहे. आता नेते कधी पावणार आणि तिकिट कधी मिळणार याचीच इच्छुकांना प्रतिक्षा लागली आहे.
पितृपक्ष फलदायीच
पितृपक्षामध्ये विवाह, मुंज आणि वास्तुशांती हे तीन कार्य करू नयेत. पितृपक्षात पितरांचा आशिर्वाद मिळतो. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासारखी कामांनाही पितृपक्षात अशुभ म्हणता येणार नाही. पितृपक्षात येणारी निवडणूक प्रक्रिया यामध्ये अशुभ समजण्याचे कारण नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.