भिवंडी महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावरून राजकारण तापले; आयुक्तांनी दिले स्थगितीचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 03:28 PM2021-02-26T15:28:17+5:302021-02-26T15:30:35+5:30
Bhiwandi Municipal Corporation : मनपात भाजपाकडे असलेले विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे सुपूर्द केल्यापासून भाजपसह काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी : काँग्रेसची एकहाती सत्ता असूनही महापौर पद कोणार्क विकास आघाडीकडे आल्यापासून भिवंडी शहरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. यातच काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यापासून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यातच मनपात भाजपाकडे असलेले विरोधी पक्षनेते पद राष्ट्रवादीकडे सुपूर्द केल्यापासून भाजपसह काँग्रेसच्या नगरसेवकांच्या पोटात गोळा निर्माण झाला आहे.
महापौरांनी महासभेत केलेली विरोधी पक्षनेते पदाची नियुक्ती बेकायदेशीर आहे, अशी तक्रार नगर विकास मंत्र्यांकडे केल्यानंतर नगर विकास मंत्र्यांच्या आदेशाने मनपा आयुक्तांनी विरोधी पक्षनेते पदास स्थगिती दिली आहे. यावरून आता चांगलेच राजकारण तापले आहे. शहर विकास वगळता नेहमी या-ना-त्या राजकीय विषयात चर्चेत असलेल्या भिवंडी महापालिकेच्या विरोध पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे नगरसेवक मतलूब अफजल खान उर्फ मतलूब सरदार यांची नियुक्ती २२ जानेवारी राजी झालेल्या महापालिकेच्या महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी केली होती.
मतलूब सरदार यांच्या नियुक्तीवर काँग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी आक्षेप घेत थेट राज्याचे नगरविकास मंत्री यांच्याकडे या नियुक्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत नगर विकास मंत्र्यांनी महापालिकेत महापौरांनी महासभेत केलेली मतलूब खान यांच्या विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीस स्थगिती दिल्याने मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी देखील ही नियुक्ती स्थगित केल्याचे निर्देश प्रशासनासह खान यांना दिले आहे. तर पुनर्नियुक्तीसाठी आता राष्ट्रवादीच्या गोताणे वरिष्ठांकडे धाव घेतली असून त्यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत.
२२ जानेवारी रोजी झालेली महासभा रद्द केल्याने त्यासभेत झालेले इतर विषय रद्द केले मग विरोधी पक्षनेते पदाच्या नियुक्तीचा विषय कसा मंजूर होऊ शकतो यावर आपण आक्षेप घेतला होता आता महापौरांनी पुन्हा विरोधी पक्षनेते पद जे आमच्याकडे होते ते पुन्हा नियुक्त करावे, अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते यशवंत टावरे यांनी दिली आहे.