कुरघोडीच्या राजकारणाने माढ्याचा फड रंगला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 04:33 AM2019-04-16T04:33:35+5:302019-04-16T04:34:25+5:30
माढा लोकसभा मतदारसंघात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
- समीर इनामदार
माढा लोकसभा मतदारसंघात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर आता एकमेकांवर जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त आहेत.
राष्टÑवादी काँग्रेसकडून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे आणि भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर रिंगणात आहेत.
संजय शिंदे यांना माढा वगळता इतर तालुक्यांत मताधिक्य मिळू नये, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणले आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरणास संजय शिंदे यांनी विरोध केल्याचे सांगून त्यांच्याविरुद्ध प्रचारास प्रारंभ केला आहे.
त्याच वेळी संजय शिंदे आपण पाण्याच्या बाजूने आहोत, आपला विरोध नाही, हे सांगताना दिसत आहेत.
संजय शिंदे यांच्याकडून आ. गणपतराव देशमुख, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, आ. भारत भालके, आ. बबनराव शिंदे यांनी प्रचारास जोर लावला आहे. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडून आ. प्रशांत परिचारक, आ. जयकुमार गोरे, शेखर गोरे, आ. नारायण पाटील, माजी आमदार शहाजीबापू पाटील, राजेंद्र राऊत, कल्याणराव काळे यांनी प्रचाराची आघाडी उघडली आहे.
दोन्ही बाजूंनी एकमेकांवर वैयक्तिक आरोपांची राळ उडविली जात आहे. काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे यांनी राष्टÑवादीचा प्रचार
करण्यास नकार दिल्याने संजय शिंदे यांची गोची झाली आहे. एकेकाळचे मित्र आता राजकारणात शत्रू बनल्याचे या निवडणुकीतून दिसून आले
आहे. शरद पवार, अजित पवार यांनीही संजय शिंदे यांच्यासाठी सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर त्याचा अधिक फायदा
होईल, अशी अपेक्षा रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अॅड. विजय मोरे हेदेखील लढतीत आहेत. ते
किती मते मिळवितात, यावर बरेच अवलंबून आहे.
>सोलापूर जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण गेल्या अनेक वर्षांपासून माढा लोकसभा मतदारसंघात काम करीत आहोत. विरोधकांकडे कोणताही मुद्दा नाही, त्याचा फायदा आम्हाला होईल.
- संजय शिंदे,
राष्ट्रवादी काँग्रेस
>आमची लढाई संजय शिंदे यांच्याविरुद्ध नसून, बारामतीच्या शरद पवारांविरुद्ध आहे. या भागातील सिंचन, पाण्याचा प्रश्न जाणीवपूर्वक मागे ठेवण्यात आला. याची दखल मतदार निश्चितपणे घेतील.
- रणजितसिंह निंबाळकर,
भाजप
>कळीचे मुद्दे
पाणी, सिंचनाचे प्रश्न, ऊसदर हे मुख्य मुद्दे आहेत. रखडलेल्या प्रकल्पांवर अधिक भर.
मोहिते-पाटील यांच्यासह अनेक नेते भाजपकडे. पाण्याच्या मुद्द्यावर एकमेकांना घेरण्याची तयारी.