“हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण"; देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षा कपातीवरून भाजपाचा आरोप
By प्रविण मरगळे | Published: January 10, 2021 12:05 PM2021-01-10T12:05:45+5:302021-01-10T12:09:47+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार आहे.
मुंबई – राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कपात केल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण रंगू लागलं आहे. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांची सुरक्षा व्यवस्था कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला, यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
याबाबत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करत ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच हे सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसलेले असताना सर्वाधिक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. शनिवारीही भंडारा येथे घडलेल्या दुर्देवी घटनास्थळी तेच पोहचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सूडबुध्दीच राजकारण आहे असं भाजपाने म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil , @mipravindarekar यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 10, 2021
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड यांना विशेष सुरक्षा यापुढे नसणार आहे. मध्यंतरीच्या काळात देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांच्या निकटवर्तीयांना चिंता लागली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीत अनेक नक्षलवादीविरोधी निर्णय घेतल्याने त्यांच्या जीवाला धोका कायम असल्याचं बोललं जात आहे.
रात्री उशीरा फडणवीसांना असणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेतून पायलट वाहन आणि बुलेटप्रुफ गाडी काढून घेण्यात आली. काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील उच्चपदस्थ मंत्री अधिकाऱ्यांच्या बैठकीत नेत्यांना मिळणाऱ्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. याच बैठकीत देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ वाहन काढण्याची सूचना देण्यात आली अशी चर्चा सुरु आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने वाय दर्जाच्या सुरक्षेची शिफारस केली होती, यापूर्वी देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा होती.
इतकचं नाही तर काही मंत्र्याची सुरक्षाही कमी करण्यात आली आहे. यात संजय बनसोडे, अस्लम शेख यांचा समावेश आहे. तर भाजपाच्या चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येतो, ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करत त्यांना वाय दर्जावरून झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर राज ठाकरेंच्या सुरक्षेतही कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज ठाकरेंना झेड सिक्युरिटी मिळत होती त्याठिकाणी आता वाय सिक्युरीटी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.