Pooja Chavan Death Case: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले शरद पवार; संजय राठोडांना शक्तिप्रदर्शन महागात पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 09:01 AM2021-02-24T09:01:13+5:302021-02-24T09:04:06+5:30
Pooja Chavan Death Case: राठोड यांच्या पोहरादेवीतील शक्तिप्रदर्शनानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राठोड यांच्याबद्दल नाराजी व्यक्त
मुंबई: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं समजतं. काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
राठाेडांचे शक्तिप्रदर्शन, पण नियमांचे उल्लंघन; आरोप खोटे असल्याचा पाेहरादेवीत दावा
संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं.
पाेहरादेवीत हजारोंची गर्दी, जमावबंदी आदेशाला फाटा; तात्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश
कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरेंनी रविवारी (२१ फेब्रुवारी) दिला. मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला राठोड यांच्या समर्थकांनी हरताळ फासला. पोहरादेवी परिसरात केवळ ५० जणांना जमण्याची परवानगी असताना हजारो लोक उपस्थित होते. त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केलं. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत.
पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री ठाकरेंची मूकसंमती, लपवाछपवीचं काम; भाजपचा थेट आरोप
पोहरादेवीच्या दर्शनानंतर काय म्हणाले संजय राठोड?
पूजा प्रकरणाच्या आड समाजात बदनामी करण्याचे घाणेरडे राजकारण खेळून तीस वर्षांचे राजकीय जीवन संपवण्याचा घाट घातला जात असल्याचे राठोड यांनी सांगितले. विराेधकांकडून करण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले असून त्यात सर्व बाबी स्पष्ट होतील, असे सांगतानाच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, अशी विनंती त्यांनी केली.
माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात
सोशल मीडियावर व्हायरल पूजासोबतच्या फोटोंबाबत राठोड म्हणाले, गेली ३० वर्षे सामाजिक-राजकीय जीवनात आहे. यानिमित्ताने अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढतात. मी १५ दिवस गायब नव्हतो. मुंबईतील फ्लॅटवरून शासकीय कामकाज करत होतो. आजपासून पुन्हा पूर्वीप्रमाणे काम करणार आहे. चौकशीमधून सर्व सत्य बाहेर येईल, आपण विश्वास ठेवा, असेही ते म्हणाले.