"धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही", फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
By बाळकृष्ण परब | Published: March 1, 2021 12:24 PM2021-03-01T12:24:30+5:302021-03-01T12:24:41+5:30
Pooja Chavan death case, Devendra Fadnavis targets CM Uddhav Thackeray : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूजा चव्हाण (Pooja Chavan death Case) प्रकरणावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ( "Moral strength does not come when you have to tell a blatant lie", Devendra Fadnavis targets CM Uddhav Thackeray)
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले की, कालच्या पत्रकार परिषदेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्र्यांची अवस्था केविलवाणी झाली होती. अशी स्थिती त्यांच्यावर येऊ नये. धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक धैर्य येत नाही. मुख्यमंत्र्यांनी चेहऱ्यावर मास्क लावला असतानाही ते दिसत होतं.
मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावरून टीका करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा चव्हाण प्रकरणात समोर आलेल्या क्लीप्स खऱ्या की खोट्या, यवतमाळच्या रुग्णालयात जे घडलं ते खरं की खोटं याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असे आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसेच कुणाला साधूसंत ठरवायचं असेल तर ठरवा. मात्र तुमच्या नैतिकतेचं काय असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.
यावेळी मोहन डेलकर या खासदारांनी मुंबईत केलेल्या आत्महत्येबाबत सवाल विचारला असता फडणवीस म्हणाले की, आत्महत्या कुणाचीही असो त्याची चौकशी झालीच पाहिजे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेल्या ठिकाणावरून सुसाईड नोट सापडली आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे. कुणीही आरोप करत असले तरी या सुसाईड नोटमध्ये कुठल्याही भाजपाच्या नेत्याचं नाव नाही. जर त्या सुसाइ़ड नोटमध्ये भाजपाच्या नेत्याचं नाव असतं तर ते एवढ्यात जाहीर केलं, असतं, असा टोला फडणवीस यांनी लगावला.