Pooja Chavan : शक्तिप्रदर्शनाबाबत शरद पवारांच्या नाराजीवर संजय राठोड यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले....
By बाळकृष्ण परब | Published: February 24, 2021 10:08 AM2021-02-24T10:08:45+5:302021-02-24T10:11:31+5:30
Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod's reaction on Sharad Pawar's displeasure : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर बेपत्ता झालेले वनमंत्री संजय राठोड यांनी काल सर्वांसमोर येत पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.
मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) आरोप झाल्यानंतर बेपत्ता झालेले वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी काल सर्वांसमोर येत पोहरादेवी येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. मात्र या शक्तिप्रदर्शनामुळे महाविकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) हे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर आता संजय राठोड यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. (Sanjay Rathore's response to Sharad Pawar's displeasure over the show of strength)
काल झालेल्या शक्तिप्रदर्शनानंतर आता मंत्री संजय राठोड हे आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीसाठी रवाना झाले आहेत. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करून शरद पवार यांच्या नाराजीबाबत विचारले असता संजय राठोड म्हणाले की, शरद पवार यांच्या नाराजीबाबत मला याबाबत काही बोलायचे नाही. मी जे काही बोलायचं आहे ते काल बोललो आहे. काल सांगितल्या प्रमाणे आजपासून मी माझ्या शासकीय कामांना सुरुवात करणार आहे. आता मी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुंबईत जात आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या समस्यांमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचं समजतं. काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी त्यांनी राठोड यांच्याबद्दल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
संजय राठोड यांच्यावर झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं. संजय राठोड यांच्यावरील आरोपांचा परिणाम मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेवर होत असल्याचं पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या राठोड यांनी काल पोहरादेवीला भेट दिली. त्यावेळी तिथे हजारो लोक उपस्थित होते. राठोड यांच्याकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनावर मुख्यमंत्रीदेखील नाराज असल्याचं समजतं.