आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही, चित्रा वाघ यांची राठोडांवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 02:51 PM2021-02-23T14:51:47+5:302021-02-23T14:56:28+5:30

pooja chavan suicide case : संजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळायला हव्या, वाघ यांची मागणी

pooja chavan suicide case bjp leader chitra wagh criticize shiv sena leader minister rathod | आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही, चित्रा वाघ यांची राठोडांवर सडकून टीका

आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही, चित्रा वाघ यांची राठोडांवर सडकून टीका

Next
ठळक मुद्देसंजय राठोडांच्या मुसक्या सरकारनं आवळायला हव्या, वाघ यांची मागणीसमाजाला वेठीस धरण्याचा आता ट्रेंड, चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोडयांनी या प्रकरणी मंगळवारी पहिल्यांदाच भाष्य केलं. पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती. बंजारा समाजावरील संकट दूर व्हावं यासाठी याठिकाणी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असं म्हटलं. यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली आहे. 

"सध्या बलात्काऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या लोकांची तू पाठिशी घालणार का मी पाठिशी घालू अशी चढाओढ सुरू आहे. हे सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला साजेसं नाही. परंतु आता या लोकांनी नुसत्या घोषणा बाजूला ठेवून संजय राठोड यांच्या मुसक्या आवळायला हव्या. राठोडांनी समाजाला वेठीस धरलं. बंजारा समाजाबद्दल आम्हाला आदर आहे. आपण काहीही करायचं आणि समाजाला वेठीस धरायचं हे चालू देणार नाही. गुन्हेगाराला कोणतीही जात, धर्म नसतो," असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला. 

समजाला वेठीस धरण्याचा ट्रेंड

"सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. परंतु त्यांच्याच पक्षाच्या नेता आपलं वाईट कृत्य समाजाच्या मागे घालून झाकण्याचा प्रयत्न करत आहे. याबद्दल गर्दी जमवून असं कसं कोण करू शकतं याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. समाजाला वेठीस धरण्याच्या ट्रेंड आता राजकारणात सुरू होऊ लागला आहे. कितीही लोकं आली जोरात नारे दिले म्हणून तुम्ही खरे आहात असं होत नाही. बंजारा समाज धाडसी आहे. आम्हाला आदर आहे. परंतु तो आदर संजय राठोडांसाठी नाही. ते हत्यारे आहेत. आरोपींना कोणतीही जात नसते. जे अनुत्तरीत प्रश्न आहेत त्याची उत्तरं त्यांना द्यावीच लागतील. महिलांचा विषय हा राजकारणाचा विषय नाही," असंही वाघ म्हणाल्या. 

काय म्हणाले राठोड?

"बंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण या तरूणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला, या मृत्यूचा बंजारा समाजाला दु:खं झालंय, मात्र या प्रकरणावरून जे घाणेरडं राजकारण केलं जातंय, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. मी मागासवर्गीय समाजाचं, ओबीसी, भटक्या कुटुंबातून येऊन नेतृत्व करतो त्यामुळे माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात आहे. या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपासाचे आदेश दिलेत. या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण माझी बदनामी करण्यासाठी घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल," असं राठोड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

सत्य तपासातून समोर येईल

"मागील १५ दिवसांपासून माझं काम सुरूच होतं, माझ्याबद्दल टीव्हीवरचं प्रेम पाहत होतो, या दिवसात शासकीय काम मुंबईच्या बंगल्यातून सुरू होतं, माझ्या कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, मुला-बाळांना धीर देत होतो. त्यांना सांभाळण्याचं काम केलं. आज या पवित्र भूमीत येऊन पुन्हा मी माझ्या कामाला सुरूवात करणार आहे. पोलीस चौकशी सुरू आहे, या तपासातून सत्य बाहेर येईल, अरूण राठोड कोण मला माहिती नाही. सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत. माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात. सर्वांना सोबत घेऊन मी काम केलं आहे. एका घटनेने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे," अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं आहे.

Web Title: pooja chavan suicide case bjp leader chitra wagh criticize shiv sena leader minister rathod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.