"पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 12:35 PM2021-02-23T12:35:03+5:302021-02-23T12:38:29+5:30
pooja chavan suicide : भाजपची संजय राठोड यांच्यावर टीका
पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानंतर गेले पंधरा दिवस माध्यमांपासून दूर असलेले राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मंगळवारी २३ फेब्रुवारीला पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या पुढे आले. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सहपरिवार दर्शन घेणे व त्यानंतर यवतमाळात कोरोनाची आढावा बैठक घेणे असा त्याचा मंगळवारचा अधिकृत कार्यक्रम होता. दरम्यान यावरून आता भाजपनं त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
"पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?," असं म्हणत भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राठोड यांच्यावर टीका केली. "युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव असलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मुख्यमंत्री गप्प. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात. सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, मुख्यमंत्री किमान कोरोनाचे नियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरी करणार का ?," असा सवालही त्यांनी केला.
पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल जर चव्हाणाच्या पूजाच काय झाल ते सांगितल तर नाहीत तर ?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 23, 2021
युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव असलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मुख्यमंत्री गप्प. मात्र @OfficeofUT यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिसेन्सचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात. सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, मुख्यमंत्री किमान कोरानाचेनियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरीकरणार का ?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) February 23, 2021
पूजा चव्हाण या २२ वर्षीय युवतीच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. तिने आत्महत्या केली, गॅलरीतून पडून तिचा मृत्यू झाला असे पोलिसांनी म्हटले आहे. तिच्या आईवडिलांनी आमची कोणाबाबत तक्रार नाही असा जबाब दिला आहे. मुळची परळी येथील असलेली पूजा चव्हाण, इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात गेली आणि तिने आत्महत्या केल्यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने भाजपाने टीकेची झोड उठविली आहे.
चित्रा वाघ यांनी दिलं पोलिसांना निवेदन
प्रसिद्धीमाध्यमातून समोर आलेल्या बातम्यांनुसार तिची आजी, भाऊ यांनी मात्र आमची मुलगी आत्महत्या करणारी नव्हती म्हणत ही हत्या असून याची चौकशी व्हावी ही मागणी केली. दरम्यान १२ ऑडियो क्लीप बाहेर आल्या, ज्यात पूजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून तर आत्महत्येनंतर दरवाजा तोड. पण तिचा मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतच संभाषण आहे. हा आवाज दुसरा तिसरा कोण नसून राज्याचा शिवसेनेचा वनमंत्री संजय राठोड यांचा आहे. काही फोटो ही आहेत ज्यात पूजा ही संजय राठोडच्या संपर्कात होती हेही दिसतंय. इतके ढळढळीत पुरावे असतानाही पुणे पोलीस मात्र संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाही, असं वाघ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.