Pooja Chavan Suicide Case: मोठी बातमी! अखेर वनमंत्री संजय राठोडांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा
By प्रविण मरगळे | Published: February 16, 2021 10:24 AM2021-02-16T10:24:04+5:302021-02-16T11:10:23+5:30
Will CM Uddhav Thackeray accept the resignation of Minister Sanjay Rathod in Pooja Chavan Suicide Case: अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे
मुंबई – परळीच्या पूजा चव्हाण आत्महत्येनंतर एका मंत्र्याचं नाव या प्रकरणी समोर आलं, त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं, शिवसेना मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) यांच्यासोबत असलेल्या कथित संबंधामुळे पूजा चव्हाण(Pooja Chanvan)ने आत्महत्या केली असा आरोप भाजपाने(BJP) केला होता, यात आरोपानंतर संजय राठोड यांचं मंत्रिपद अडचणीत सापडलं होतं, राठोड यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपाने केली होती.( Minister Sanjay Rathod sent his resignation to CM Uddhav Thackeray in Pooja Chavan Suicide Case)
अखेर या प्रकरणात संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे, टीव्ही ९ ने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, संजय राठोड यांचा राजीनाम्याबाबत सोमवारपासून विविध चर्चा सुरु होत्या. यात शिवसेनेत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून दोन मतप्रवाह असल्याचंही दिसून आलं, मातोश्रीवर आज शिवसेनेच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे, तत्पूर्वी संजय राठोड यांनी हा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वीकारला असल्याचं कळतंय, निष्पक्ष चौकशीसाठी हा राजीनामा स्वीकारला आहे, शिवसेनेत(Shivsena) एक मोठा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभं असल्याचं सांगण्यात येत होतं. धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचं? असा प्रश्न काही नेते उपस्थित करत आहेत शिवाय असं झालं तर वेगवेगळ्या मुद्यांवर विरोधक राजीनामे मागत सुटतील असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे.
तर पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह शिवसेनेत पाहायला मिळत आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. गेल्या काही दिवसांपासून राठोड अज्ञातवासात आहेत, त्यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य केले नाही, मात्र बंजारा सामाजाने आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. मात्र या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्र्याचा कडक इशारा
काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर आता शिवसेना मंत्री संजय राठोड यांचे नाव तरूणीच्या आत्महत्येशी जोडलं गेलं आहे, त्यामुळे शिवसेनेची आणि सरकारची नामुष्की होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्याच पक्षाच्या संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन एकप्रकारे इतरांना कडक इशारा दिल्याचंही बोललं जातंय.
संजय राठोड मौन सोडणार?
पूजा चव्हाण आत्महत्येनंतर अज्ञातवासात असलेले मंत्री संजय राठोड हे येत्या गुरुवारी माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडणार असल्याचं कळतंय, वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने संजय राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.