Pooja Chavan : मंत्र्यावरील आरोपांमुळे शिवसेना गंभीर, संजय राठोड यांना दिला मोठा आदेश
By बाळकृष्ण परब | Published: February 13, 2021 01:46 PM2021-02-13T13:46:27+5:302021-02-13T14:25:58+5:30
Shiv Sena gives order to Sanjay Rathore after allegations in Pooja Chavan Suicide Case : पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली आहे.
मुंबई - पूजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्याने राज्यातील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून हे प्रकरण सातत्याने लावून धरण्यात येत असल्याने महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने मंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांना सक्त आदेश दिले आहेत. (Pooja Chavan Suicide Case)
या प्रकरणी विरोधी पक्षाकडून तसेच सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमधून होत असलेल्या आरोपांबाबत संजय राठोड यांची थेट प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मंत्री संजय राठोड यांना सक्त आदेश देण्यात आले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलू नका, असे आदेश शिवसेनेकडून राठो़ड यांना देण्यात आले आहेत. राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यास अडचणीत अधिकच वाढ होऊ शकते, अशी शक्यता असल्याने संजय राठोड यांना अशी सूचना करण्यात आली आहे.
गेल्या पाच-सहा महिन्यांत नाजूक प्रकरणांवरून महाविकास आघाडी सरकारवर आरोप होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी दिशा सालियनची आत्महत्या, तसेच धनंजय मुंडेंवर झालेला बलात्काराचा आरोप यामुळे सरकार अडचणीत सापडले होते. हे वाद निवळण्याची चिन्हे दिसत असतानाच पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येचे प्रकरण समोर आल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.
पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी ७ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंग होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.