पॉर्न ॲप्स, वेबसाइट, ओटीटीची टास्क फोर्समार्फत झाडाझडती घ्या, आशिष शेलारांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 09:26 PM2021-07-25T21:26:07+5:302021-07-25T21:48:20+5:30
Ashish Shelar : केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे 1 अश्लील अॅप सबस्क्राइब रेव्हेन्यू म्हणून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे.
मुंबई : नुकत्याच अटक झालेल्या राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांच्या तपासात अश्लील साईट आणि उद्योगातील गुन्हेगारांकडून तरुणांचे शोषण आणि प्रचंड आर्थिक फसवणूकीची अनेक धक्कादायक माहिती उघड होते आहे. त्यामुळे या प्रकरणी संयुक्त टास्क फोर्स नियुक्त करुन अधिक झाडाझडती करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे 1 अश्लील अॅप सबस्क्राइब रेव्हेन्यू म्हणून दरमहा २० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे. होतकरू तरुण तरुणींचे शोषण करून दबाव आणून हे व्हिडीओ तयार केली गेली होती. अशा 40 हून अधिक बेकायदेशीर अश्लील ॲप्स आणि वेबसाइट्स सदस्यत्वातून शेकडो कोटींची कमाई करतात.
या सगळ्यातून तरुण पिढीवर, किशोर वयीन मुलांवर विपरीत परिणाम होत असून नकारात्मकतेने घेरले आहे. चाइल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे ही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत 2019 पासून 15,000 पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या आणि 213 एफआयआर नोंदविण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. सन 2017 पासून 2019 पर्यंत पॉस्को प्रकरणात 45% वाढ झाली आहे. ही अत्यंत बाब चिंताजनक आहे.
Illegal PORN Mafia ExploitingYOUTH/Children to earn Hundreds of Crores !
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 25, 2021
15,000+ child porn clips in Maha, 45% jump in POSCO (Child sex) cases - UNACCEPTABLE !
I wrote to Home Minister Shri @AmitShah ji to request Immediate action on Porn mafia ! pic.twitter.com/J5wB9OnxoW
तर मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात. (Balaji Telefilms, VOOT, MX Player, Ullu, Kooku, DesiFlix, Hot Shots, Primeflix, GupChup, Flizmov ही त्यातील आघाडीची नावे घेतली जात आहेत.) म्हणून सीबीआय, ईडी, आय अँड बी, आयटी मंत्रालय, वित्त मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्कफोर्स तयार करुन अशा सर्व अश्लील ओटीटी अँप्स आणि वेबसाइट्सची झाडाझडती घेण्यात यावी.
तसेच पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशी सर्व ॲप्ससाठी कठोर नियमावली आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत. नागरिकांना अशी सर्व प्रकरणांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी केंद्रीय पातळीवर पॉर्न आणि चाइल्ड पॉर्न हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. त्याबाबत माहिती वेळोवेळी सोशल मीडिया हँडल देण्यात यावे. तसेच सर्व ओटीटी वरील फिल्म, वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमात आणण्याबाबत विचार करण्यात यावा, गंभीर बाब म्हणजे ड्रग्ज माफिया आणि या अश्लीलतेचा व्यापार करणाऱ्या माफियांचे साटेलोटे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे त्याचाही कसून तपास करण्यात यावा, अशा मागण्या आमदार आशिष शेलार यांनी केल्या आहेत.