मामा-भाच्याच्या सत्ताकारणासाठी भोसरीकर करताहेत मोर्चेबांधणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 02:52 AM2019-01-24T02:52:53+5:302019-01-24T02:53:06+5:30
शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचाली सुरू आहेत.
नितीन शिंदे
भोसरी : शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हालचाली सुरू आहेत. शिरूरसाठी भाजपातून महेश लांडगे व राष्ट्रवादीकडून विलास लांडे इच्छुक आहेत. मात्र, भोसरीतील मामा-भाचे यांनी विरोधात लढण्याऐवजी एकमेकांना साथ द्यावी, अशी मोर्चेबांधणी भोसरीकरांकडून केली जात आहे. युती व आघाडी होणार असल्याची गृहीत धरून लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून विलास लांडे व विधानसभेसाठी महेश लांडगे यांनी निवडणूक लढवावी, अशी दोन्ही बाजूंच्या समर्थकांची मागणी आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, राज्यातील भाजपा-शिवसेना युतीचे जागा वाटपावरून घोडे अडले आहे. मात्र, युतीच्या समीकरणावर दोन्ही पक्षांतील इच्छुकांची रणनीती ठरणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात युतीतील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी तयारी ठेवली आहे. युती न झाल्यास शिवसेनेकडून विद्यमान खासदार शिवाजी आढळराव पाटील व भाजपाकडून आमदार महेश लांडगे हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, युती झाल्यानंतर महेश लांडगे पुन्हा भोसरी विधानसभेसाठी दावा करणार आहेत. त्याच वेळी माजी आमदार विलास लांडे यांनीही राष्ट्रवादीतून लोकसभा व विधानसभा दोन्हींसाठी दावा केला आहे.
महेश लांडगे हे विलास लांडे यांचे भाचेजावई आहेत. मात्र, गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मामा-भाचे आमनेसामने आले. त्यामध्ये लांडगे यांनी मामा विलास लांडे यांच्यावर मात केली होती. या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांचे नातेवाईक एकच असल्याने त्यांच्यासह समर्थकांचीही पंचाईत झाली होती. आगामी लोकसभा अथवा विधानसभेत मामा-भाचे पुन्हा एकमेकांविरोधात लढू नये, अशी आखणी भोसरीकरांकडून केली जात आहे. त्यासाठी विलास लांडे यांना शिरूर लोकसभा व महेश लांडगे यांना भोसरी विधानसभेसाठी साथ देण्याची मागणी समर्थकांकडून केली जात आहे. दोघांचे मनोमिलन घडविण्यासाठी ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे.
>चौकार थोपविण्यासाठी राष्ट्रवादीची रणनीती
शिरूर लोकसभेत शिवसेनेचे आढळराव हे विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा चौकार अडविण्यासाठी मी शिरूरमध्ये लढण्यास तयार असल्याचे रणशिंग राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमांत फुंकले होते. त्यामागे मतदारसंघातील स्थानिक नेत्यांना चुचकारणे होते. शिवाय पुण्यात झालेल्या बैठकीत विलास लांडे यांना शिरूरची तयारी करण्याचा आदेश अजित पवार यांनी दिला आहे.