'मालेगाव स्फोट घडवल्याच्या सन्मानार्थ प्रज्ञासिंहला उमेदवारी'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 03:31 AM2019-04-24T03:31:02+5:302019-04-24T03:31:37+5:30
शरद पवार यांचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबई : मालेगाव स्फोट घडवल्याच्या सन्मानार्थ साध्वी प्रज्ञासिंहला भाजपने उमेदवारी दिली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. विकास, शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी, महागाई या महत्त्वाच्या मुद्द्यांऐवजी हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर प्रचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मते मागण्याचा अधिकार नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवाजीनगर येथील जाहीर सभेत केली.
उत्तर पूर्व मुंबईचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्या प्रचारार्थ पवारांनी शिवाजीनगर येथे सभा घेतली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्यासह मित्रपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान जेव्हा शपथ घेतो, तेव्हा तो सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम करणार असे सांगतो. मोदींच्या हिंदुत्ववादी प्रचाराने देशात जातीय तेढ निर्माण होतेय, दोन धर्मांमधली दरी वाढतेय, असा आरोपही त्यांनी केला. पाच वर्षांत देशाची काय अवस्था झाली आहे, याचा विचार करा आणि मतदान करा, असे आवाहनही त्यांनी केले.
जागेअभावी कार्यकर्त्यांचा गोंधळ
शिवाजीनगर येथील जुना बस डेपो परिसरात सायंकाळी ६ वाजता शरद पवार यांच्या सभेला सुरुवात होणार होती. खारघर येथील सभेमुळे रात्री ९.३० च्या ठोक्याला पवार व्यासपीठावर पोहोचले. जागेअभावी कार्यकर्त्यांचा गोंधळ झालेला
दिसून आला.