'हिंमत असेल प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 05:40 AM2019-04-24T05:40:21+5:302019-04-24T05:41:07+5:30
अशोक चव्हाण यांचे भाजपला आव्हान
मुंबई : मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. भाजप एकीकडे देशभक्तीचे नारे देत
आहे; तर दुसरीकडे करकरेंचा अवमान करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला उमेदवारी देऊन अतिरेक्यांचे संरक्षण करत आहे. हिंमत असेल तर भाजपने आधी प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करावी, असे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले.
दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी चव्हाण यांनी आज प्रचारसभा घेतल्या. प्रज्ञासिंह ठाकूरला वाचविण्याचे काम भाजप सरकारने केले. सरकारी वकिलानेच सरकारचा दबाव असल्याचे सांगितले. भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. देशाची चावी कोणाच्या हाती द्यायची आहे यासाठी ही निवडणूक आहे. खरा चौकीदार कोण हे पाहून मत करा. २०१४ च्या निवडणुकीत विरोधी पक्ष वेगवेगळे लढल्यामुळे सत्ता आली नाही. या वेळी आम्ही सर्व जण एकत्र आलो आहोत, असेही चव्हाण म्हणाले.
सेना-भाजपने मुंबई लुटली
धारावीचा डास आणि मला चावणारा डास एकच म्हणून रक्ताचं नातं म्हणणाºया उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे, असा सवाल करतानाच गुडनाइटचे बटन दाबून शिवसेना- भाजपला पराभूत करा, असे आवाहनही चव्हाण यांनी केले. मोदी-फडणवीसांनी पाच वर्षांत काय केले, शिवसेना-भाजपने मुंबई लुटली. या दोघांनी मिळून महाराष्ट्र चुलीत घातला. आता देशात परिवर्तनाची गरज असल्याचे चव्हाण म्हणाले.