Anil Deshmukh: “केंद्रावर राजकीय सूडापोटी कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक”; भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:29 PM2021-07-16T19:29:16+5:302021-07-16T19:33:00+5:30
Anil Deshmukh: भाजपने ठाकरे सरकारला फटकारले असून, केंद्रावर राजकीय सूडापोटी कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे, अशी टीका केली आहे.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. यातच सक्तवसुली संचालयाने कारवाई करत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या ४ कोटी २० लाख रुपये किमतीच्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहे. यावरून भाजपने ठाकरे सरकारला फटकारले असून, केंद्रावर राजकीय सूडापोटी कारवाईचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे, अशी टीका केली आहे. (pravin darekar react on ed seize anil deshmukh property and slams over thackeray govt)
माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप सिंग यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. यावरून आता भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरून टीका केली आहे.
“मतदान घ्या, मग तुमची ताकद पाहू; बहुमत आहे, तर घाबरता कशाला?”: देवेंद्र फडणवीस
याचा अर्थ त्या तपासात तथ्य आहे
राजकीय सूडापोटी केंद्र सरकार आणि एजन्सी काम करतात, असे बोलणाऱ्यांना ही चपराक आहे. तपासात मालमत्ता जप्त झाली, याचा अर्थ त्यात तथ्य आहे. अशा कोणत्याही यंत्रणेला मनमानी करता येत नाही. आता भाजपवर, केंद्रावर आणि तपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांचे समाधान होईल. आता या प्रकरणात सत्यता असल्याचे दिसून आले आहे. भविष्यात यातील तथ्य आणि सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
राजकीय सूडापोटी कारवाई होत असल्याचा आरोप करणाऱ्यांचे कदाचित आता समाधान होईल, कारण माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या केसमध्ये तथ्य असल्याचे पुरावे दिसून येत आहेत!@BJP4Maharashtrapic.twitter.com/kzQmSk0IMF
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 16, 2021
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर ईडीने छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, प्रत्यक्ष चौकशीला हजर राहण्यास अनिल देशमुख यांनी नकारही दिला. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याशिवाय अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि मुलाला देखील चौकशीसाठी ईडीने समन्स बजावले होते. आता त्यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे.