राष्ट्रवादी विधानसभेसाठी तयार : मंगळवारपासून तीन दिवस मुलाखती घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 08:25 PM2019-07-21T20:25:19+5:302019-07-21T20:35:08+5:30
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सर्व २८८ जागांचा आढावा घेतला. पक्षाची ताकद, त्यासाठी आलेले इच्छुकांचे अर्ज यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानुसार दि. २३ ते २५ या तीन दिवसांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पवार यांच्या पुण्यातील घरी छगन भुजबळ यांच्यासह पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते. बैठकीमध्ये २८८ विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुकांकडून आलेल्या अर्जांचा आढावा घेण्यात आला. राज्यभरातून सुमारे ८०० अर्ज आले आहेत. प्रत्येक जागेचा तपशील बारकाईने अभ्यासण्यात आला. तेथील पक्षाच्या ताकदीची माहिती घेण्यात आली. आता विधानसभानिहाय सर्व नेत्यांकडे मुलाखतींची जबाबदारी देण्यात आली आहे, असे पाटील यांनी सांगितले. अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करण्याबाबत चर्चा झालेली नाही. काँग्रेसबरोबर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ. पक्षाचे नेते, मित्रपक्षांना विश्वासात घेऊन निवडणुकांना सामोरे जाऊ, असे पाटील यांनी नमुद केले.
काँग्रेस व मित्रपक्षातील जागावाटपाविषयी बोलताना पाटील म्हणाले, जागावाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे. मंगळवारी किंवा बुधवारी पुन्हा बैठक होणार आहे. यामध्ये २२० जागांपर्यंतचे निर्णय होऊ शकतात. राज ठाकरे यांच्या आघाडीतील सहभागाबद्दल अद्याप चर्चा झाली नाही. त्यांच्याबाबत काँग्रेस किती अनुकूल आहे, याची माहिती नाही.प्रकाश आंबेडकर यांना दोन्ही पक्षांकडून पत्र पाठविले आहे. धर्मांध शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे, असे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
नेत्यांना सत्तेची मस्ती
चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा व शिवसेनेतील नेत्यांकडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार येणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच आघाडीच्या २० जागा निवडून येतील, असे पाटील यांनी म्हटले आहे. यावर टीका करताना पाटील म्हणाले, मोजायची सवय असणाºयांकडून अपेक्षा काय करायची. सत्तारूढ नेत्यांना किती मस्ती आहे, हे यावरून दिसते. लोकसभा निवडणुकीत लोकांनी मोदींना मते दिली. हे आपल्याच मते दिल्याच्या अविर्भावात आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला.